सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाला अनेक वर्षानंतर अखेर पूर्णवेळ प्रशासन अधिकारी लाभला असून नूतन प्रशासन अधिकारीपदी धाराशिव येथील शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी किंवा सोमवारी ते शिक्षण मंडळात पदभार घेणार आहेत. सध्या येथील अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे आहे.
सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचा कारभार गेली अनेक वर्षापासून प्रभारी किंवा अतिरिक्त पदभार अशा अधिकाऱ्यांवर चालला होता. अखेर या शिक्षण मंडळाला पूर्णवेळ अधिकारी लाभला आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाकरीता घेण्यात आलेल्या मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या ३३ खालील उमेदवारांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर (वेतनस्तर. एस-१७ : ४७६००-१५११००) या वेतनसंरचनेत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येत आहे. त्यांची पदोन्नतीनंतरची पदस्थापना केली आहे. याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव सिद्धार्थ घोरपडे यांनी आदेश काढला आहे.
यापूर्वी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांना पदोन्नतीने शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई, पश्चिम विभाग, मुंबई येथे पदस्थापना देण्यात आल्यानंतर येथील रिक्त प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोलापूर महापालिकेतील सहाय्यक आयुक्त गिरीष पंडीत यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यतच्या कालावधीसाठी अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानुसार दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी गिरीश पंडित यांनी पदभार स्वीकारला होता. साधारणतः आठ महिने गिरीश पंडित यांनी महापालिका शिक्षण विभागाचा कारभार पाहिला. दरम्यान, सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे देण्यात येत असल्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी काढले होते. 9 जुलै 2025 रोजी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे हे मंडळात रुजू झाले होते. विठ्ठल ढेपे यांनी यापूर्वीही मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा प्रभारी कार्यभार दि. 1 जून 2023 ते 11 सप्टेंबर 2023 दरम्यान सांभाळाला होता.
विठ्ठल ढेपे यांनी मागील चार महिन्यात चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळाला.
दरम्यान, आता शासनाने धाराशिव येथील शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांचीसोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदी पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. मल्हारी माने हे एक उपक्रमशील अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. यापूर्वी त्यांनी नगरपरिषद प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी शिक्षण विभागात एकूण 28 वर्षे प्रशासकीय सेवा केली आहे. एक मास्टर ट्रेनर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. शुक्रवारी किंवा सोमवारी ते महापालिका शिक्षण मंडळात पदभार घेणार आहेत.

















