तभा फ्लॅश न्यूज/बदनापूर : शासनाच्या गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत गंभीर गैरकारभार होत असल्याचा आरोप करत, बदनापूरमधील शिवभोजन केंद्राची तातडीने सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे.
प्रभारी तहसीलदार हेमंत तायडे यांना दिलेल्या निवेदनात, या केंद्रावर चाललेला प्रकार म्हणजे शासनाच्या योजनेचा सरळसरळ गैरवापर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित केंद्र चालकाने शासनाची अनुमती नसताना खासगी विद्यार्थ्यांची मेस सुरू केली असून, त्याच विद्यार्थ्यांचे फोटो वापरून शासनाकडून शिवभोजन योजनेचे अनुदान घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे गरजू नागरिकांना शिवभोजन योजनेचा लाभ मिळत नसून, गरीब जनता उपाशी राहत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे या केंद्राच्या मागील तीन महिन्यांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सच्चाई समोर आणावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.ही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बदनापूर तालुकाध्यक्ष विलास खैरे, निखिल सोनवणे, विकास खरात, दत्ता खरात व राजू ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मुख्य मुद्दे :
• गरिबांसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर
• विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान मिळवण्याचा प्रकार
• सीसीटीव्ही तपासणीची मागणी
• कारवाई न झाल्यास उपोषणाचा निर्धारजनतेच्या हक्काचा प्रश्न, प्रशासनाची कसोटी!