बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी समाजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक श्रीमती डॉ. अरुणा ढेरे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील, सहसचिव ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रा. मिलींद जोशी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बार्शीने महाराष्ट्राला खूप मोठी माणसे दिली. मामासाहेब हे कर्तृत्वाचे एक उत्तुंग शिखर होते. बोर्डिंगच्या माध्यमातून मामांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. मामांनी संस्थेबरोबरच माणसे उभी केली. सध्या शिक्षण व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. खूप मोठया संधी उपलब्ध होत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळात रुपांतर आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात तंत्रज्ञान सक्षम होणे गरजेचे आहे. विदयार्थ्यांना पदवीतील गुणांबरोबरच कौशल्ये गरजेची आहेत. औद्योगिक व आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.
बदलाचा गंभीर्याने विचार करायला हवा. सातत्याने अध्ययनशील रहावे लागेल. शिक्षकांचे ताण वाढत आहेत. ज्ञान सत्तेचा दरारा कमी होत आहे. चांगले करिअर व योग्य करिअर यांचा समन्वय गरजेचा आहे. विदयार्थ्यांनी शिक्षक व पालकांशी मोकळा संवाद केला पाहिजे. शिक्षकांनी एका प्रश्नाची अनेक उत्तरे स्वीकारावीत. सर्जनशीलता, कल्पकता, वेगळ्या वाटा शोधणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे. नैराश्यवादाचे मोठे संकट उदयास येत आहे. निराश होऊ नका. संकटावर मात करा. न्यूनगंड, भयगंड व अपराधगंड याला बळी पडू नका. वाचन व खेळ याची सवय लावा. आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे. साहित्य हे जीवनाचे मूलभूत अंग आहे. आपल्या कलागुणांना वाव द्या, असे त्यांनी सांगितले.
साहित्यिक श्रीमती डॉ. अरुणा ढेरे यांनी वैचारिक व साहित्यिक विवेचनातून अध्यक्षीय समारोप केला. संस्थेचा बहरलेला विस्तार पाहून आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मामांची साधी राहणी होती. बहुजनांच्या उन्नतीचे शिक्षण हे साधन आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. लोकसंस्कृतीत महिलांचे मोठे योगदान आहे. शिक्षणातूनच महिलांना आत्मविश्वास दिला. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात मानवी बुद्धिमत्तेचे महत्व कमी होऊ देऊ नका. तरुण हे आपल्या देशाचे भांडवल आहे. आयुष्याची माती लावून काम करा. उद्याची गाणी लिहिली जाणारी पिढी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सातारा येथील शहीद जवान अमर शामराव पवार व अहिल्यानगर येथील शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या वीर माता-पिता, वीर पत्नी व वीर सुपुत्र यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी गंगाराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी संस्थेचे ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी स्वागतपर संबोधन केले. संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मवीरांचे विचार, कार्यप्रणाली व संस्थेची वाटचाल विशद केली. संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. आर ए फुरडे यांनी करुन दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय डॉ.रविकांत शिंदे यांनी करुन दिला. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाने “कर्मवीरांची आम्ही लेकरे” हे स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आसावरी फरताडे व डॉ. रविकांत शिंदे यांनी तर आभार ए.पी. देबडवार यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शाखाप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, हितचिंतक, कर्मवीर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.



















