सोलापूर – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाते मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत आहेत. तीर्थक्षेत्र बाळेस्थित श्री खंडोबा मंदिरात पवित्र मार्गशीर्ष महिन्यात देवाची यात्रा दर रविवारी भरत असते. यात्रेचा हा तिसरा व शेवटचा रविवार असल्याने अबालवृद्ध भाविकांनी पहाटेपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी एकच मांदियाळी केली होती. अनेक भाविकांनी “येळकोट येळकोट जय मल्हार”; सदानंदाचा येळकोट घे “मल्हारी मार्तंड की जय! घोषणांचा निनाद करत बेलभंडाऱ्याची मुक्त उधळण केली. यावेळी श्रींच्या गर्भ गाभार्यात मल्हारी मार्तंड आणि देवी म्हाळसाकांत यांच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सर्वत्र प्रसन्नतेचे आणि धार्मिकतेचे वातावरण दिसून आले.
दरम्यान, कुलदैवत असणाऱ्या अनेक भाविकांनी मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पहाटेच हजेरी लावली होती. कोटंबा आणि वारू घेऊन भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर अनेक भाविकांनी मंदिर परिसरात देवाचे नाव घेऊन वारू सोडला. मंदिरात पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी आठ वाजता महा अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर श्री यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. तदनंतर महापूजा व घोडा नंदिध्वजसह पालखी सोहळा रात्री साडेआठ वाजता संपन्न झाला. यात्रेची सांगता पौष शुद्ध षष्ठी बांगरषष्ठी शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रसाद वाटपाने होणार असून सर्व मानकरी — पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आणि गावकरी तसेच भाविकांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करून यात्रेचा समारोप होतो.

यात्रेतील १४ डिसेंबर शेवट रविवार असल्याने भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी
बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपरिक मार्गशीर्ष चंपाषष्ठी यात्रा यंदा मार्गशीर्ष शुद्ध षष्टी, बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून ते आज दि.१४ डिसेंबर या शेवट रविवारी उत्साहात संपन्न झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गदर्शन पर्यंत येणाऱ्या प्रत्येक रविवारी श्री खंडोबाची यात्रा भरत असते. रविवार दि. ३०/११/२०२५, ०७/१२/२०२५ आणि १४/१२/२०२५ या तीन रविवारीसह एकूण चार दिवस यात्रा भरली.महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. आज यात्रेतील १४ डिसेंबर शेवट रविवार असल्याने भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होती.
– गणेश पुजारी, मंदिराचे पुजारी
श्रीची पालखी ,घोडा व मानाचे नंदिध्वज मिरवणूक मोठ्या मोठ्या उत्साहात संपन्न
यात्रा कालावधीत पहाटे ५.०० वाजता काकड आरती, तर सकाळी ८.०० वा. आणि रात्री ७.०० वा. महापूजा व अभिषेक करण्यात आले. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळी नृत्य, तळी-भंडारा उचलणे, भंडार खोबरे उधळणे वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे यांसह विविध धार्मिक पार पाडले. यात्रा कालावधीत श्री खंडोबा देवाची मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी व यात्रेतील प्रत्येक रविवारी श्रीची पालखी ,घोडा व मानाचे नंदिध्वज मिरवणूक मोठ्या मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली.
– विनय ढेपे, ट्रस्टी अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.
श्रीखंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.
















