मंगळवेढा – पोलीस ठाण्यात नव्याने महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून डॉ.आरती कणिरे या दाखल झाल्या असून त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्विकारला आहे. दरम्यान गेली अनेक वर्षे येथे महिला अधिकारी नसल्यामुळे महिलांच्या गंभीर समस्या सोडविण्यात अडचण येत असल्याने पत्रकारांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे महिला अधिकार्याची मागणी केली होती.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षे महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे गंभीर स्वरुपाच्या तक्रार घेवून येणार्या महिलांचे प्रश्न सुटणे कठीण बनले होते. मागील पाच वर्षापुर्वी येथील महिला पोलीस अधिकार्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते.
मागील दोन आठवड्यापुर्वी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी हे वार्षिक तपासणी दरम्यान मंगळवेढ्यात आल्यावर पत्रकारांनी येथे महिला पोलीस अधिकार्याची नितांत गरज असल्याचे सांगून तशी मागणी केली होती. याची दखल घेवून महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे ह्या मंगळवार दि.6 जानेवारी रोजी नाशिक येथील ट्रेनींग सेंटर वरुन थेट कोल्हापूर परिक्षेत्र विभागामधून मंगळवेढ्याला दाखल झाला आहेत. त्या मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावच्या असून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. त्या 2021 च्या बॅचच्या आहेत.
मंगळवेढा पोलीस ठाण्याला एक महिला अधिकारी मिळाल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना पदभार देण्यात आला.
























