तभा फ्लॅश न्यूज/पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष असताना इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांत या मतदारसंघावर दावेबाजी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे हे यंदाच्या निवडणुकीसाठी मोठ्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. चिवटे यांनी शिक्षक आंदोलनात शासन आणि शिक्षक यांच्यात संवाददूताची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.
या मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसचे जयंत तासगावकर यांनी अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता. मात्र, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती. सध्याच्या राजकीय समीकरणात ही जागा महाविकास आघाडीकडून पुन्हा काँग्रेसकडेच जाईल, अशी शक्यता आहे. पण महायुतीत ही जागा भाजपकडेच राहील की शिंदे गटावर सोपवली जाईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मंगेश चिवटे यांच्यासह दत्तात्रय सावंत, जयंत तासगावकर आणि विजयसिंह माने हे देखील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान या इच्छुकांची लगबग सुरु झाली असून राजकीय घडामोडी अधिक वेग घेत आहेत.