नायगांव – तालुक्यातील नरसी चे भुमीपुत्र गझल कार मारोती मानेमोड यांनी मराठी गझल विश्वात आपल्या आगळ्या-वेगळ्या खयालांनी व माणुसकी चा हुंकार देणाऱ्या शब्दांनी स्वतंत्र ओळख निर्माण करीत वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. सतीश दराडे राज्यस्तरीय ‘ गावगाडा ‘ या गझल साहित्याला यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानामुळे त्यांच्या साहित्यिक प्रवासाला नवी उंची लाभली आहे.
गाव गाड्यांच्या मातीतील गंध जपणाऱ्या आणि माणसाच्या अंतरंगातील वेदना, आशा, संघर्ष यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या रायांच्या गझलांनी मराठी रसिकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. साध्या शब्दांतून मोठे अर्थ सांगणारी त्यांची लेखणी आज मराठी गझल क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण करीत असल्याचे आज पहायला मिळत आहे.
सध्या विदर्भात शिक्षकी पेशातून ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच, मारोती मानेमोड उर्फ रायांनी आपल्या साहित्य प्रतिभेच्या जोरावर मराठी गझले च्या विश्वात दर्जेदार आणि आशयघन लेखनाची मुशाफिरी सुरू ठेवली आहे. अध्यापन आणि लेखन यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
त्यांचा पहिलाच गझलसंग्रह“निर्गुणी आकार”रसिक व समीक्षकां
मध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. हृदयाला भिडणाऱ्या, मर्मभेदी आणि तत्त्वज्ञानाची झलक देणाऱ्या गझलांनी सजलेल्या संग्रहाला आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार लाभले असून, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना लोकप्रियतेचे लक्षवेधी वलय प्राप्त झाले आहे.
या यशस्वी पुरस्कार यात्रेत आता सोलापूर
जिल्ह्यातील वडशिवणे येथील प्रतिष्ठित राज्यस्तरीय सन्मानाची मानाची भर पडली आहे. विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले व संयोजक समितीने या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली आहे.
या सन्मानामुळे गझलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नरसीचे नांव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंत गझल कार मारोती मानेमोड यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
[नरसी चे भूमी पुत्र गझलकार मारोती माने मोड.]



















