सोलापूर – महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ० ते १८ वर्षे वयोगटातील विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य-साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी श्री. रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी अलीमको, मुंबई आणि राईज बायोनिक्स, बेंगळुरू या संस्थांच्या माध्यमातून अस्थिव्यंग, मेंदूचा पक्षघात, अंधत्व, कर्णबधिरता तसेच बौद्धिक अक्षमत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य-साधने उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमात एकूण २५८ विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना ट्रायसायकल, व्हीलचेअर, रोलेटर, श्रवणयंत्र, टी.एल.एम. किट, सुगम्य केन, ब्रेल किट, कुबड्या, स्मार्ट फोन, कॅलिपर, सी.पी. चेअर आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
याशिवाय एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे संचलित शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, बाळे (सोलापूर) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे दृष्टी मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार १९२ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य लेखाधिकारी श्री. रत्नराज जवळगेकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांच्या बलस्थानांचा योग्य वापर करून त्यांना समाजातील सुजाण आणि उत्पादनशील नागरिक म्हणून घडवता येते. अशा मुलांविषयी लाज न बाळगता त्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्यास त्यांच्या भावनिक, मानसिक व सामाजिक विकासास मोठी मदत होते.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. मल्हारी माने यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात; मात्र त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात टिकवणे आवश्यक आहे. सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या साह्याने नियमित विद्यार्थ्यांसोबत कोणताही भेदभाव न करता विशेष विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण केले जाते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक व काळजीवाहक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


























