अक्कलकोट – श्री दत्त गुरुचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा १४८ वा पुण्यतिथी महोत्सव वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे चालू आहे. यामध्ये पहाटे पाच वाजता काकडारती नंतर सुमधुर सनई चौघड्याचे स्वर कानी पडतात.वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात पुण्यतिथी महोत्सवात गेल्या ४० वर्षापासून मावडीकरांची दुसरी पिढी सनई चौघडा वादनाची सेवा सादर करीत अक्कलकोट वासीयांची स्वामी भक्तांची पहाट अविस्मरणीय करत आहेत.
सनईवादक मावडीकर हे १९८७ ला सोलापुर येथे काही कामानिमित्त आले होते. तेव्हा ते
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे तात्कालीन विश्वस्त चेअरमन स्व. बाळासाहेब इंगळे यांची भेट झाली. त्या भेटीत दोघांचे संभाषण होऊन मावडीकर यांना स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवात सनई चौघडा वादनाची सेवा करण्याबाबत बोलणे झाले. १९८७ ला तारद्वारे स्वामीच्या दरबारात सनई चौघडा वादनासाठी आमंत्रित करण्यात आले. . सध्या मावडीकर यांची दुसरी पिढी गणेश मावडीकर पुणे हे चौघडा वादनाचे काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला सध्या स्वामींचे निस्सीम भक्त गोरख धेंडे रा .दांडेकर पुल पुणे सनई वादनाची सेवा करीत अlहेत .
पहाटेच्या समयी सनई चौघडा वादनाचे समधुर स्वर कानी पडून अक्कलकोट वासीयांची व स्वामी भक्तांची पहाट संस्मरणीय होत असल्याची माहिती वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.























