सोलापूर – आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे घोडे पुन्हा एका जागेवर अडले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील चारही उमेदवारी आमच्या पक्षाला मिळावेत, यासाठी उद्धवसेनेचे नेते अजय दासरी आणि अस्मिता गायकवाड आग्रही भूमिका घेत आहेत. तर खुद्द आपल्या कार्यकर्त्याला एक जागा मिळावी यासाठी शरद राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी देखील आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी आणि दुपारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. बैठकीबाबत त्यांना विचारले असता, अजून वाटाघाटी सुरू आहे. असे सांगितले.
दरम्यान, या बैठकीस माजी आमदार आडम मास्तर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रवक्ते अशोक निम्बर्गी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर, भरत जाधव, शंकर पाटील, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, मा कपचे एम. एच शेख, नसीमा शेख आदींची उपस्थिती होती. सकाळी आणि दुपारी असे दोन सत्रात महाविकास आघाडीच्या बैठका संपन्न झाल्या. या दोन्ही बैठकीत प्रभाग क्रमांक १४, आणि ६ या जागांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी प्रभाग क्रमांक ६ मधील चारही जागांवर शिवसेनेने दावा केल्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हरकत घेतली. त्यातील एक जागा आम्हाला द्यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर दोन्ही सत्रातील बैठकीत तोडगा निघाला नाही.
आज आघाडीचे फुल अँड फायनल होणार
आघाडीतील मित्र पक्षांमध्ये एक दोन जागांवर एक मत झाले नाही. त्या संदर्भात दोन सत्रात बैठका झाल्या. मात्र शिवसेना नेत्यांची भूमिका आग्रही होती. आज पुन्हा सकाळी बैठक होईल त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल.
महेश गादेकर, शहराध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आघाडीमध्ये चर्चा सुरू
शुक्रवारी घेण्यात आलेल्या दोन्ही सत्रातील बैठकीत निर्णय झाला नाही. आमच्या जागेवर आम्ही आमचा दावा केलेला आहे. आज पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
– अजय दासरी, शहर प्रमुख उद्धव ठाकरे शिव
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एका जागेवर चर्चा सुरू
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रभाग क्रमांक ६ मध्ये दावा केला आहे. येथे शिवसेनेचे गणेश वानकर विद्यमान नगरसेवक असून त्यांनी चारही जागा मागितल्या आहेत. त्याच ठिकाणी राष्ट्रवादीने देखील चंद्रकांत पवार यांच्यासाठी जागा मागितली आहे. त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.
-चेतन नरोटे, शहराध्यक्ष काँग्रेस

























