सोलापूर – शहरातील पानटपऱ्यांमध्ये सुरू असलेली मावा – गुटखा विक्री, मटका व जुगार व्यवसाय यावर तात्काळ बंदीची प्रभावी अंमलबजावणी व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सायबन्ना तीग्गेळी यांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर हे कामगार व कष्टकरी वर्गाचे शहर असून, येथे हजारो कुटुंबे रोजंदारीवर उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध भागांमध्ये पानटपऱ्यांवर तंबाखू मिक्स मावा, गुटखा, सुगंधित तंबाखू, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीसह मटका व जुगाराचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला असून, त्याचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम नागरिकांवर होत आहेत.
शासनाने गुटखा व तंबाखूयुक्त पदार्थांच्या विक्रीस बंदी घातलेली असतानाही, शहरातील दोन ते तीन हजारांहून अधिक पानटपऱ्यांमध्ये हे प्रतिबंधित पदार्थ कोणत्याही भीतीशिवाय खुलेआम विकले जात आहेत. विशेषतः कामगार वर्ग कमावलेले पैसे मटका-जुगारामध्ये हरवून आर्थिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जात आहे, ज्यामुळे घरगुती कलह, सामाजिक असुरक्षितता, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.
याशिवाय, युवक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये मावा – गुटख्याचे व्यसन झपाट्याने वाढत असून, त्यातून कॅन्सर, तोंडाचे रोग, मानसिक अस्थिरता व व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवत आहेत. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलेही सहजपणे हे पदार्थ खरेदी करताना दिसत असून, परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. तसेच, परवाना नसलेल्या पानटपऱ्या, तसेच परवाना असूनही नियमांचे उघड उल्लंघन करणाऱ्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औषध प्रशासन विभाग व पोलिस यंत्रणेच्या संयुक्त देखरेखीअभावी हा अवैध व्यवसाय अधिकच बळावला आहे.
यावेळी सलाउद्दीन शेख, नागेश पासकंटी, नागेश माने, गुरुनाथ पाताने आदी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
मावा, गुटखा आणि इतर प्रतिबंधित तंबाखू पदार्थांच्या विक्रीवर असलेली बंदी काटेकोरपणे अंमलात आणून नियमित तपासणी मोहिमा राबवा.
शहरातील सर्व पानटपऱ्यांची तपासणी करून बेकायदेशीर व परवाना नसलेल्या दुकानांवर तात्काळ कारवाई करा.
प्रतिबंधित पदार्थांचा होलसेल पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून सखोल तपास करावा.
पोलिस आणि औषध प्रशासन यांनी संयुक्त प्रतिबंधित विक्री, मटका-जुगार केंद्रांवर नियमित धाडी टाकाव्या.
अल्पवयीन मुलांना तंबाखू पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून परवाने रद्द करावे.
“मावा–गुटखा मुक्त सोलापूर” व “जुगारमुक्त सोलापूर” अशी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी.
























