बार्शी – बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपने नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व बैठकीदरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाम शब्दांत घोषणा केली की, ‘बार्शीचा नगराध्यक्ष आणि नगरपरिषद ही भाजपचीच असणार!’
या बैठकीत बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, माजी आमदार राजाभाऊ राऊत हे सर्व धर्मीय, समाजघटकांना सोबत घेऊन बार्शी शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या विकासदृष्टीला बळ देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने, नेत्याने आणि जनतेने ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
गोरे यांनी पुढे सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा केवळ राजाभाऊंचा नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा तोटा होता. ‘आता ही हानी भरुन काढण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद निवडणूक ही त्यासाठीची सुवर्णसंधी आहे,’ असे ते म्हणाले.
पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केलं की, भाजपसोबत शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) या मित्रपक्षांचा ताकदीनिशी पाठिंबा असल्याने बार्शी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आघाडी अजेय ठरेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात लाडके आमदार म्हणून राजाभाऊ राऊत यांचं नाव घेतलं जातं. राऊत हे पक्षाचे कट्टर सैनिक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टीमवर भाजपला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासकामांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
गोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, नगरपरिषद निवडणूक ही केवळ पक्षासाठी नव्हे तर बार्शीच्या विकासासाठी आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोचवा, एकनिष्ठेने काम करा आणि नगरपरिषद भाजपच्या झेंड्याखाली आणा, असे ते म्हणाले.
या बैठकीस माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शी तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी, विविध प्रभागांतील इच्छुक उमेदवार तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांच्या निवडीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, पुढील काही दिवसांत पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

















