वेळापूर – वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील ऊसतोड मुकादम, टोळी मालक तसेच ट्रॅक्टर मालक-चालक यांची संयुक्त बैठक वेळापूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान ऊसतोड टोळ्यांमध्ये काम करणाऱ्या बाहेरील जिल्हा व परराज्यातील कामगारांची संपूर्ण माहिती — ओळखपत्र व छायाचित्रांसह यादीच्या स्वरूपात पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे आवश्यक असल्याचे संबंधितांना अवगत करण्यात आले.
तसेच हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या गावी असणाऱ्या टोळी मालक, मुकादम आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हालचालींची माहिती संकलित करून सादर करणे बंधनकारक असल्याचे सूचित करण्यात आले. गावाच्या हद्दीत घरफोडी, चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
यावेळी प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी टोळी मालकांना स्पष्ट सूचना दिल्या की ऊसतोडीच्या कामात अठरा वर्षांखालील कोणताही मुलगा किंवा मुलगी कामावर ठेवू नये. अशा प्रकारची अल्पवयीन मुले कामात आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच ऊसतोड कामगारांवर लक्ष ठेवणे, ते कामाच्या ठिकाणावरून पळून जाणार नाहीत याची दक्षता घेणे, आणि सर्व कामकाज पारदर्शकपणे करण्याच्या सूचना प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी दिल्या.

















