तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय, विजापूर रोड येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय आपदा मित्र प्रशिक्षणात सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. एक राखी तंबाखू व्यसनमुक्तीची या नावाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्ततेचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात सारथी युथ फाउंडेशनच्या सहकार्याने प्रशिक्षणार्थींना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपत्तीच्या काळात व्यसन करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक असतात. व्यसनमुक्त राहून आपत्ती टाळता येते, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
रक्षाबंधनाच्या अनुषंगाने कामगार वसाहतीतील युवतींनी स्वतः तयार केलेल्या राख्या प्रशिक्षणार्थींना बांधल्या. राखी बांधताना त्यांनी “आपण तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये” अशी ओवाळणी मागितली. या अनोख्या उपक्रमाने प्रशिक्षणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. कार्यक्रमात प्रशिक्षक प्रदिप ऐनापुरे, सारथी युथ फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर उपस्थित होते.
प्रशासनाचा दृष्टिकोन
आपत्तीच्या कालावधीमध्ये व्यसनमुक्त राहणं अत्यंत गरजेचं आहे. बचाव कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी मिळते, ती जपली पाहिजे.
-शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
प्रशिक्षणार्थींची प्रतिक्रिया
“एक राखी तंबाखू व्यसनमुक्तीची हा उपक्रम खूप छान वाटला. वेगळ्या प्रकारचा रक्षाबंधन साजरा झाला. मी स्वतः व्यसनमुक्त राहिन आणि इतरांनाही व्यसनमुक्त राहण्यास प्रेरित करीन.
– सुरज कांबळे, प्रशिक्षणार्थी आपदा मित्र