राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करू शकतात. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मागील लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षणीय मतं घेतली होती. त्याचा फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला. तर काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका बसला.
महाविकास आघाडीनं वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला. पण तो वंचितला मान्य नाही. तुमच्या ४ जागा तुमच्याकडेच ठेवा, असं प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. २६ मार्चपर्यंत प्रतीक्षा करु. महाविकास आघाडीनं काही सकारात्मक पावलं न उचलल्यास आपण भूमिका जाहीर करू, असा अल्टिमेटम आंबेडकरांनी दिला होता. त्यामुळे आज आंबेडकर काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन पक्ष, डावे पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करू शकतात. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या आघाडीचं नेतृत्त्व दिलं जाऊ शकतं. तिसरी आघाडी प्रत्यक्षात आल्यास वंचित बहुजन आघाडी २९ जागांवर निवडणूक लढवू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरुन घेतलेली भूमिका, त्यांनी घेतलेली मनोज जरांगे पाटील यांची भेट पाहता जरांगेंना मानणारा एक मोठा वर्ग या आघाडीला साथ देऊ शकतो.
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. २६ तारखेला मी भूमिका जाहीर करेन. २७ मार्चला अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करेन, असं आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे आंबेडकर आज भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल जागावाटपाबद्दल दोन तास चर्चा झाली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत वंचितबद्दलही चर्चा झाल्याचं कळतं. त्यामुळे मविआकडून वंचितला नवा प्रस्ताव दिला जातो ते पाहणंही महत्त्वाचं असेल.


















