टेंभुर्णी : महाराष्ट्राचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे शनिवार, २१ मार्च रोजी टेंभुर्णीत शिवगौरी संकल्प प्लाझा येथे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, एक्सपोर्टर व व्हेंडर यांच्याशी विचार विनिमय करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माढा लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकाटे पुढे म्हणाले की, केळी व्यापाऱ्यांकडून युद्धाच्या नावाखाली केळीचे दर पाडून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल चढ्या भावात विक्री करत आहेत. केळी, पेरू, द्राक्ष फळ उत्पादक शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचे शासनाचे संरक्षण नाही. एक्सपोर्ट करणारे व्यापारी दोन-दोन, तीन-तीन महिने केळीचे पैसे देत नाहीत. व्यापाऱ्यांकडून वारंवार दर पाडले जातात. यामुळे जळगावप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही केळी दराचा बोर्ड तसेच शेतकऱ्यांना असावा.
टेंभुर्णी: ना. भरतशेठ गोगवले यांच्या दौऱ्याविषयी माहिती देताना संजय कोकाटे, पोपट अनपट, संतोष पाटील, वैभव कुटे आदी मान्यवर.
विकलेल्या मालाचे पैसे मिळण्याची हमी असावी, अशा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणींसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ना. भरतशेठ गोगावले हे टेंभुर्णी येथे येत आहेत.
त्यानंतर ना. भरतशेठ गोगावले हे केळी, डाळिंब, द्राक्ष, पेरू व आंबा अशा प्लॉटला भेट देणार आहेत. यामध्ये टेंभुर्णी येथील वैभव कुटे यांच्या केळी बाग, सुर्ली येथील डॉ.
मनोज काळे यांच्या पेरूच्या प्लॉटला व भागवत आजिनाथ काळे यांच्या केळी प्लॉटला, अकोले-खुर्द येथील संतोष बलभीम पाटील यांच्या डाळिंब प्लॉटला व ऋषिकेश रामभाऊ पाटील यांच्या आंबा बागेला भेट देणार आहेत.
त्यानंतर ते मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी आयोजित केलेल्या ग्रामदैवताच्या
यात्रेनिमित्तच्या कुस्ती मैदानास भेट देणार आहेत, असे कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य पोपट अनपट, बनाना व्हेंडर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, वैभव कुटे, शफी शेख, सागर तळेकर, पंकज जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























