बार्शी – येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्यावतीने आणि ईव्ही फार्म इंडिया पुणे यांच्या सहकार्याने आयोजित ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स, बॅटरीज अँड सेन्सर्स’ या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनआयटी गोव्याचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. सुरेश मिक्किली, ईव्ही फार्म इंडियाचे संचालक भूषण नावरकर, एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मार्गदर्शक प्रा. प्रभा कासलीवाल, प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात प्रा. स्वाती कराड चाटे यांनी सांगितले की, ‘विकसनशील देशांनी प्रगती करताना पाश्चिमात्य देशांकडून झालेल्या चुकांमधून शिकून आणि स्थानिक गरजा ओळखून विकासाची दिशा ठरवली पाहिजे. निसर्गातील विविध घटकांचे सहअस्तित्व आणि शाश्वततेकडे नेणारा विकास हाच खरा भविष्याचा मार्ग आहे.’ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आजचे विद्यार्थी भविष्यात देशाच्या विकासाचे एक घटक असणार आहेत, तेव्हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबर तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभवासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन आवश्यक आहे.’ डॉ. सुरेश मिक्किली यांनी ई-वाहन क्षेत्रातील संशोधन व नवकल्पनांसाठी उपलब्ध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी आणि भारतात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. भूषण नावरकर उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, भारतातील ई-वाहन तंत्रज्ञानातील प्रगती व भविष्यातील संधी याबाबत माहिती दिली.
यावेळी बोलताना प्रा. प्रभा कासलीवाल यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत शाश्वत विकासामध्ये त्यांची भूमिका मांडली तर प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी संस्थेची दृष्टी, शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. ई-वाहन तंत्रज्ञान, बॅटरी व्यवस्थापन, सेन्सर प्रणाली, ईव्ही पायाभूत सुविधा आणि स्मार्ट एनर्जी सिस्टिम्स अशा विविध विषयांवर या कार्यशाळेत तज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्वांनी एकत्र येऊन उद्योग-शिक्षण संवाद आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संधीवर सखोल चर्चा केली. प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रिया व तंत्रज्ञान अनुभवण्यासाठी कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय माने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया जोशी यांनी केले.

























