तभा फ्लॅश न्यूज/माहूर : माहूर तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतजमिनीवर थेट पूरपाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तुरी, भाजीपाला यांसह इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी आज पूरग्रस्त अंजनखेड,बोंड गव्हाण, मदनापूर, सायफळ, वडसा, पडसा,टाकळी, रुई,हडसणी,या गावांना भेट देत शेतशिवारातील नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, नुकसानाची व्याप्ती व तातडीच्या गरजा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, बुडालेल्या जनावरांचे प्रश्न, तरतुदींचा अभाव आणि मदतीची निकड याविषयी आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या.
या भेटीदरम्यान आमदार केराम यांनी महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना अद्याप पर्यंत जिथे पाहणी व पंचनामे झाली नाही अशा ठिकाणी तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. पूरामुळे झालेल्या नुकसानीचे खरे आकलन होऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप, सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड,, , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, महसूल विभागाचे अधिकारी,कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूरामुळे शेतकऱ्यांची झालेली हानी लक्षात घेता तातडीची मदत मिळावी, ही सर्व बाधित शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होती.
“शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यांच्या अडचणींकडे शासनाने गंभीरतेने पाहिले पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मी स्वतः शासनदरबारी पाठपुरावा करणार असून, नुकसानभरपाई व मदतकार्य तातडीने मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन,” असे आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी यावेळी दिले.
माहूर तालुक्यातील पडसा गावाजवळील पैनगंगा नदीवरील पूल प्रचंड पुराच्या पाण्याच्या तडाख्याने कोरून गेला. या घटनेमुळे गावकऱ्यांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकरी शिवारात अडकून पडले होते. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यास त्रास होत आहे, तर रुग्णांना दवाखान्यात पोहचवणे हेही कठीण बनले आहे.पाहणीदरम्यान आमदार केराम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले दरवर्षी पावसाळ्यात पूल आणि रस्त्यांचे नुकसान होत असले तरी विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. हा निष्काळजीपणा जनतेच्या सुरक्षेशी थेट संबंधित असून अशा कामामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे.”