मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते, सरचिटणीस, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला पाठिंबा आणि पुढील रणनीती याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे पक्षातीलच काही जण नाराज असल्याबाबत प्रश्न विचारला असता, मी पक्षाचा विचार करतो, ज्यांना समज-उमज नसेल, तर त्यांनी वेगळा विचार करावा, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. तुमची फाईल उघडली म्हणून तुम्ही भाजपला पाठिंबा दिला का, असं विचारलं असता, मी आताच पदाधिकाऱ्यांना सांगितलं, की कावीळ झाली की जग पिवळं दिसतं, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिलं. बारामतीत सभा घेणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी ठोस उत्तर देणं टाळलं. तर उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर राज ठाकरे थेट उभं राहून निघून गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, याचं विश्लेषण मी गुढीपाडव्याच्या सभेतच केलंय. पहिल्या पाच वर्षांत ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्याचा विरोधही केला. २०१४ च्या अगोदरची माझी भूमिका वेगळी होती. माझ्यावर टीका होते की सारखी भूमिका बदलतो. पण मला ही भूमिका घेणं आवश्यक होतं. याला भूमिका बदलणं नाही तर धोरणांवर टीका करणं म्हणतात. मुख्यमंत्रिपद पाहिजे किंवा माझे ४० आमदार फोडले म्हणून मी टीका करत नव्हतो. पाच वर्षात चांगल्या गोष्टींचं स्वागत केलं. कलम ३७० किंवा अयोध्येतील राम मंदिराचा निर्माणे हे अनेक वर्षांपासून रखडलेलं स्वप्न पूर्ण झालं. अनेक कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील.
सुप्रीम कोर्टाचे आदेश असले, तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं, असे कौतुकोद्गारही राज ठाकरे यांनी काढले.
मी अनेक वेळा फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. एका बाजूला कडबोळं आणि दुसऱ्या बाजूला खंबीर नेतृत्व. माझ्या महाराष्ट्रासाठी काही मागण्या आहेत त्या पोहोचवू. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, गड किल्ल्यांचं संवर्धन यासारखे विषय आहेत. नरेंद्र मोदी गुजराथी असल्यामुळे त्यांना गुजरात प्रिय असणं स्वाभाविक आहे, पण सर्व राज्यांकडे आपल्या अपत्यांप्रमाणे त्यांनी समान लक्ष द्यावं, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली.
पाठिंब्याविषयी पक्षातील नेते, सरचिटणीस, महिला पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्या कोणाशी संपर्क साधायचा, त्याची यादी तयार होईल. त्यानुसार संपर्क साधावा. आमच्या नेत्यांना मानाने वागवतील, अशी अपेक्षा आहे. मीही त्यांना पूर्ण सहकार्य आणि प्रचार करण्यास सांगितलं आहे, असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.