पंढरपूर – तालुक्यातील कासेगाव येथील जागृतदैवत अशी ओळख असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत.
श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात तसेच गावातील सर्व चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या बरोबरच हॉटेल आणि छोट्या-मोठ्या दुकानदारांनी आपले दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस देखील सोडण्यात आले आहेत.
——————
मानाचा लिबगंध व नैवेद्य
श्री यल्लमा देवीचे यात्रेत मानाचा लिंबगंध आणि नैवेद्य याला विशेष करून महत्व असते. हा लिंबगंध पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. कासेगावातील मानकरी देशमुख घराणे तसेच देशपांडे घराणे यांचे कडून मानाचा नैवेद्य देवीला दाखविण्यात येत असतो.
——————
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड
श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले. सर्व चार चाकी व तसेच दोन चाकी वाहनांना मंदिराकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांची पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आली असून तेथून सर्व भाविक भक्तांना मंदिराकडे पायी चालत जावे लागत आहे.
———————–
चोख पोलीस बंदोबस्त
पंढरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्याकडूनही यात्रेतील भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

















