सोलापूर : एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव–सोलापूर आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यात नुकताच शैक्षणिक, संशोधनात्मक आणि तांत्रिक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरीत झाला.
या कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांच्या सहकार्यातून नवीन संशोधन प्रकल्प, तांत्रिक कौशल्यवृद्धी, औद्योगिक भेटी, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान विकास यांना चालना देणे हा आहे.
स्वाक्षरी समारंभात सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर नवले, सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. डॉ. एस. एच. पवार, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे आणि केबीपी महाविद्यालय, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत व प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. बी. कांबळे, डॉ. अमोल मामलय्या उपस्थित होते.
दोन्ही शैक्षणिक संस्थांदरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता क्षेत्रात संयुक्त संशोधन, विद्यार्थी–प्राध्यापक देवाणघेवाण, सेमिनार, कार्यशाळा आणि प्रकल्प प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. विशेषत: तुती (मलबेरी) पान व फळांपासून मूल्यवर्धित उत्पादने, सिल्क फायब्रोइन बायो नॅनो-कॉम्पोझिट्स, पुढील पिढीचे शाश्वत पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आणि रेशीमाधारित नवीकरणीय ऊर्जा या अभिनव विषयांवर दोन्ही महाविद्यालये मिळून प्रगत संशोधन करतील.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळांचे अवकाश, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा उद्देश या MoU द्वारे साध्य होणार असून, हा उपक्रम सोलापूर आणि पंढरपूर परिसरातील शैक्षणिक नकाशावर एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत नोंदवले आहे.
तसेच दोन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांना इंटरनेट, लायब्ररी, संगणक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, तांत्रिक सेमिनार, प्रोजेक्ट मार्गदर्शन यांचा परस्पर लाभ मिळणार आहे. या करारामुळे ग्रामीण व शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संशोधन संधी, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि करिअरवृद्धीचे मार्ग खुल्या होतील, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला.
कराराअंतर्गत या तांत्रिक क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन राबविण्यात येणार
• तुती (मलबेरी) पानांवर आधारित प्रक्रिया उत्पादने
• तुती फळांवरील मूल्यवर्धित उत्पादने
• सिल्क फायब्रोइन आधारित बायोनॅनो–कंपोझिट्स
• शाश्वत जलशुद्धीकरण तंत्रज्ञान
• रेशीम (सिल्क फायब्रोइन) आधारित नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान
























