नायगांव / नांदेड – नायगांव तालुक्यातील जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव (पीर) संचलित निवासी मूक-बधिर विद्यालय, नरसी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि समावेशनाच्या भावनेने साजरा करण्यात आला. दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक रामदास देशमुख यांच्या हस्ते डॉ. हेलेन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्या च्या उद्देशाने आकर्षक रॅली चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या परिसरात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सह भागातून क्रीडास्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापक देशमुखांनी विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचे मनोबल उंचावले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित केलेला हा उपक्रम विशेष ठरला.
या कार्यक्रमास गिरी सर, गवळे सर, अडबलवार सर, बरशमवार सर, पांचाळ मॅडम, अक्यमवार सर आणि डुमने सर यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. सर्व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
नरसीच्या मूक-बधिर विद्यालयात साजऱ्या झालेल्या उपक्रमातून समावेशकता, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेचा सुंदर संदेश नरसीसह पंचक्रोशीतील समाजामध्ये पोहोचला.
























