नवी मुंबई, २ जुलै, (हिं.स) – विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.