सोलापूर : बुधवार पेठेतील महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय महापालिकेकडून करण्यात येणार आहे. जे कर्मचारी भाड्याने राहू इच्छितात त्यांना महापालिकेकडून नियमानुसार भाडे अदा करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
बुधवार पेठ येथील सफाई कामगारांच्या वसाहतीची इमारत धोकादायक झाल्याने येथील सुमारे 80 कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करून या ठिकाणी नवी इमारत उभारावी या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन पदाधिकारी यांची महापालिका आयुक्तांसमवेत महापालिकेत बैठक झाली. यावेळी युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू,
माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, अजित गायकवाड, शहराध्यक्ष अहोरन स्वाके, दशरथ अडाकुल, श्रीनिवास रामगल, व्यंकटेश देवनलगु , पांडुरंग रातोलू आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, नगरचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर , नगर अभियंता सारिका अकुलवार, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता श्रीकांत गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी रात्री बुधवार पेठेतील सफाई कामगारांच्या वसाहतीमधील गॅलरी कोसळल्याची घटना घडली होती. या वसाहतीमध्ये एकूण चार बिल्डिंग आहेत. हे बिल्डिंग जीर्ण झाल्याने धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नव्याने घरे बांधण्याची योजना महापालिकेकडून आखली जाणार आहे. दरम्यान सध्याच्या इमारती या धोकादायक असल्याने येथील सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी महापालिकेने कुमठा नाका येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या घरांमध्ये राहण्याची सोय करावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्यावतीने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आयुक्त म्हणाले, कुमठा नाका येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या घरांमध्ये सफाई कामगारांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यासाठी आवश्यक ऑडिट व मेंटेनन्स संदर्भात अहवाल मागून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जर कुमठा नाका येथील घरे धोकादायक असतील तर नजीकच्या खुल्या जागेत पत्राशेड उभारून निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल. याशिवाय जे कर्मचारी खाजगी भाड्याच्या घरांमध्ये जाण्यास तयार असतील तर अशांना घरभाडे भत्ता देऊ, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, असे बाली मंडेपू यांनी सांगितले.
महापालिकेने तातडीने पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा : आ. विजयकुमार देशमुख
शहरातील सफाई कामगारांची वसाहत जुनी झाल्याने धोकादायक बनले आहे. येथील इमारतीच्या जागी नवी इमारत बांधावी तेथील सफाई कामगारांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे अशी येथील युनियनची मागणी आहे. मात्र महापालिकेकडून तातडीने कार्यवाही झाली नाही. दरम्यान काल येथील गॅलरी कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुटुंब बेघर झाले आहेत. त्या अठरा आणि इतर असे सर्व मिळून 80 कर्मचारी कुटुंबाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या ठिकाणी नव्या इमारतीचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. या संदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली. आयुक्तांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, असे आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.





















