सोलापूर : सर्वांना उत्सुकता लागलेल्या सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अखेर अंतिम प्रभाग रचना आज सकाळी १० वाजता महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रसिद्ध केली.यामध्ये एकूण दहा प्रभागांमध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे. एक ते अडीच हजार मतदारांच्या फरकाने काही प्रभागात बदल दिसून येतात. शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात मात्र तब्बल सहा प्रभागात बदल करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. काही प्रभागात हे बदल केल्याने मातब्बर माजी नगरसेवक डेंजर झोन मध्ये आले असल्याची चर्चा आहे.
यामुळे आतापासूनच राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात अधिक गतीने येणार आहे.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सकाळी जाहीर केली.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार रचना होती. या प्रभाग रचनेमध्ये शहरातील दहा प्रभागांमध्ये थोडाफार फेरबदल करण्यात आला आहे. सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये चार सदस्यीय २४ प्रभाग व तीन सदस्यीय २ प्रभाग (प्रभाग क्र. २५ व २६) तयार करण्यात आले आहेत. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता तयार करण्यात आलेली प्रारुप प्रभाग रचना दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यावर नागरिक, माजी नगरसेवक, तसेच विविध राजकीय पक्षांकडून एकूण 38 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी 13 ते 22 सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान त्या संदर्भातील शिफारसी प्राधिकृत अधिकार्यांनी नगरविकास विभागास पाठवल्या, तर 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन नंबर्स यांनी आज सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली.
अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 6,10 ,11,12, 14, 15, 16, 19, 20 अशा दहा प्रभागांमध्ये फेर बदल झाला आहे. सुमारे एक ते अडीच हजार मतदारांमध्ये बदल झाला असल्याचे दिसून येतो. प्रभाग क्रमांक सहा मधील लक्ष्मी विष्णू चाळ क्रमांक एक आणि दोन ही प्रभाग 15 मध्ये जोडण्यात आली आहे. प्रभाग 15 मधील मुल्ला बाबा टेकडी परिसर हा प्रभाग 14 ला जोडला आहे. प्रभाग 14 चा अश्विनी हॉस्पिटल परिसर हा प्रभाग सोळाला जोडण्यात आला आहे. प्रभाग 16 चा विकास नगर हा परिसर प्रभाग 21 मध्ये जोडला आहे.
प्रभाग 20 मधील स्वागत नगर आणि त्या पाठीमागील परिसर हा प्रभाग 19 ला जोडला आहे. प्रभाग 19 मधील विनायक नगर हा भाग प्रभाग 12 मध्ये जोडला आहे. तर प्रभाग 11 मधील कोटा नगर परिसर हा प्रभाग दहाला जोडला आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा
मतदारसंघातील प्रभागात मोठा फेरबदल
महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सहा प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 12, 14, 15, 16, 19 आणि 20 या प्रभागांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 19 आणि 21 तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 6, 10 आणि 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे भाजपच्या उमेदवारांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. काही माजी नगरसेवकांना याचा फटका बसून ते डेंजर झोन मध्ये जातील असे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. सत्ताधारी भाजपला ही प्रभाग रचना पोषक मानली जात आहे.
सरासरी ३७ हजार ३१६ लोकसंख्येचा
चार सदस्यीय प्रभाग
प्रभागांची एकूण संख्या – २६ असून चार सदस्यीय प्रभाग २४ तर तीन सदस्यीय प्रभाग २ (प्रभाग क्र.२५ व २६) आहेत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्राची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या – ९ लाख ५१ हजार ५५८ आहे. यामध्ये अनूसुचित जातीची लोकसंख्या – १ लाख ३८ हजार ७८, अनुसूचित जमातीची लोकसंख्या – १७ हजार ९८२ आहे. यासाठी चार सदस्यीय प्रभाग सरासरी ३७ हजार ३१६ लोकसंख्या तर तीन सदस्यीय प्रभागात सरासरी २७ हजार ९८७ लोकसंख्या धरण्यात आली आहे. निवडून दयावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या – १०२ आहे.
अंतिम प्रभाग रचना पाहण्यासाठी महापालिकेत गर्दी
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना आज सकाळी दहा वाजता महापालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहाचे आवारात नागरिकांना पाहण्यासाठी लावण्यात आली आहे. येथील व्यवस्थित महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पाहणी केली. दि. 15 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी रचना आणि नकाशा पाहता येणार आहे. दरम्यान महापालिका आवारात अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी राजकीय नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक तसेच नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली.
सोलापूर महापालिकेत सन २०१७ मध्ये
असे होते पक्षीय बलाबल
सोलापूर महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच सन २०१७ मध्ये सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी असलेले एकूण १०२ जागांपैकी पक्षीय बलाबल असे – भाजपा – ४९, शिवसेना – २१, काँगेस – १४, राष्ट्रवादी काँग्रेस – ४, एमआयएम – ९, बसपा -४, माकपा -१. यापूर्वी महापालिका निवडणूक २०१७ मध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग होता. यात प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी तर दोन जागा सर्वसाधारण अशी रचना होती. त्यामुळे सर्वांना संधी उपलब्ध झाली होती.
मुस्लिमबहुल भाग प्रभाग 15 मधून
14 मध्ये समाविष्ट : अशपाक बागवान
महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यावर मी प्रभाग क्रमांक 15 संदर्भात हरकत घेतली होती. या प्रभागात मुल्लाबाबा टेकडी यासह काही भागांचा समावेश होता. हा भाग तसेच या परिसरातील तीन मशीद, चार दर्गाह व मुस्लिम बहुल भागाचा समावेश प्रभाग क्रमांक 15 मधून प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी मी हरकतीमध्ये केली होती. निवडणूक शाखेच्या प्रशासनाने ती मान्य केली आहे. या बदलामुळे या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने होईल, असा मला विश्वास आहे, अशी अशी प्रतिक्रिया अशपाक बागवान यांनी दिली.
प्रभाग रचनेतील बदलाचा काँग्रेसला फरक
पडणार नाही : काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे
महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेत जवळपास दहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. माझ्या प्रभागातदेखील बदल झाला आहे. माझ्या प्रभागाचा दहा टक्के भाग अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे तर दोन बूथ वाढले आहेत. या बदलामुळे माझ्या प्रभागात काँग्रेसला काहीच फरक पडणार नाही. काँग्रेसचे सर्व चारच्या चार उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे. गत निवडणुकीत सर्वत्र भाजपची लाट असतानादेखील आमच्या प्रभागात काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले होते.यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत लोकसभा, विधानसभेचे गणित मांडून अंदाज बांधले जात आहेत, मात्र महापालिकेची निवडणूक ही वेगळी असते असे माझे मत आहे. जनसंपर्क हा निकष आहे. तेव्हा लोकसभा व विधानसभेचे गणित या महापालिका निवडणुकीत चालणार नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.