बार्शी – शहरातील उपळाई रोडवरील शेंडगे प्लॉट येथे सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी घडलेली खुनाची घटना संपूर्ण शहर हादरवून टाकणारी ठरली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या पूनम बालाजी रोडे निरफळ (वय ३७) हिचा घराच्या किचनमध्ये तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात संशयित केतन जैन (वय ३४, रा. बार्शी) याने स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
सोमवारी सायंकाळी उघडकीस आलेले भीषण दृश्य फिर्यादी बालाजी विठ्ठलराव निरफळ (रा. शेंडगे प्लॉट, उपळाई रोड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीप्रमाणे ते रोजच्या कामानिमित्त धाराशिवला जात असतात. दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते धाराशिव येथे गेले होते. दुपारी सुमारास पत्नी पूनम हिने फोनवर बोलून “तुळशी विवाहासाठी साहित्य घेऊन या, ” असे सांगितले. बालाजी हे सायंकाळी साडेपाच वाजता घरी पोहोचले असता, घराचे मुख्य गेट कुलूपबंद आढळले. १२ वर्षीय मुलगा ओमसाई शाळेतून परत आला होता. पूनम बाहेर गेली असे वाटून काही काळ थांबले. मात्र तिच्या मोबाईलवर कॉल केल्यावर घरातूनच फोनची रिंग ऐकू आली. संशय आल्याने बालाजी यांनी चालक लालासाहेब याला गेटवरुन आत पाहण्यास सांगितले. त्याने आत डोकावून पाहिले असता, किचनमध्ये पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे दिसून आले.
मुख्य गेट व किचनचे कुलूप तोडून आत गेल्यावर घरातील दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. पूनम मृतावस्थेत, गळ्यावर धारदार वार, अंगावर केसरी रंगाचा टॉवेल आणि गळ्याभोवती ओढणी!
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा उघड झाला. घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरातील सीसीटीव्ही प्रणालीचा प्रवेश मयत पूनमच्या भावाकडे प्रसाद रोडे याच्या मोबाईलमध्ये होता. त्यातून मिळालेल्या फुटेजमध्ये संशयित केतन जैन हा किचनमधून बाहेर येताना स्पष्ट दिसून आला. याच क्षणी खुनाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
“आईला तो शिवीगाळ व मारहाण करत असे.” पती बालाजी यांनी सांगितले की, मुलगा ओमसाईने खळबळजनक माहिती दिली. “केतन काका वारंवार घरी येत होते. ते आईला शिवीगाळ व मारहाण करायचे. आई म्हणायची की, हे कोणाला सांगायचं नाही, नाहीतर मी रागावेन. त्यामुळे मी आजवर सांगितलं नाही.”
अनैतिक संबंधातून पेटला वाद, शेवट खुनात!
फिर्यादीने पुढे सांगितले की, काही वर्षांपूर्वी पूनमच्या मोबाईलमध्ये केतन जैन आणि तिच्यातील मेसेजेस पाहिल्याने त्यांच्यातील अनैतिक संबंध उघड झाले होते. या संबंधातून वाद निर्माण होऊनच केतन जैनने पूनमचा खून केल्याचा ठोस संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरु आरोपीची चौकशी तीव्र
घटनेनंतर काही तासांतच केतन जैन याने स्वतः पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पूनमच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टेमसाठी पाठविला असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही पुरावे आणि आरोपीचे विधान यावरुन पुढील तपास बार्शी शहर पोलिसांचे पथक करत आहे.
















