माहूर / नांदेड – माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे दि.20 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पाठीमागे लूटमारीचा संशयही व्यक्त केला जात असून, दोन्ही सख्या जावांचा खून झाल्याने पाचुंदासह संपूर्ण माहूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृत महिलांची नावे अंतकलाबाई अशोक आढागळे वय ६० वर्ष, अनुसयाबाई साहेबराव आढागळे वय ४५ वर्ष अशी आहेत. दोघीही कापूस वेचणीसाठी शेतात कामाला गेल्या होत्या. त्याचदरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा दाबून त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
घटना उघडकीस येताच माहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
या दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन घटनेची नोंद घेतली आहे.
















