सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक 3 डिसेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व पहिले केंद्रीय कृषिमंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनाची संकल्पना रासेयो स्वयंसेविका कु. साक्षी काळे यांनी प्रास्ताविकाद्वारे सादर केली. कृषी शिक्षण दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थी तथा प्रगतशील शेतकरी सुचित साळुंखे आणि वैभव राऊत यांनी स्वानुभातून ऊस उत्पादन यशोगाथा चलचित्रफीतीच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. सुचित साळुंखे याने स्वतःच्या शेतातील ऊस पीक पद्धतीत वापरण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
फक्त दहा गुंठे प्रक्षेत्रावर तीस टन असे ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन प्राप्त करण्यामागचे यशस्वी गमक त्याने सर्वांसमोर सविस्तर पद्धतीने मांडले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अजित कुरे यांनी “कृषी शिक्षण काळाची गरज” या विषयावरील विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमोल शिंदे यांनी ऊस पीक यशोगाथा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनस्वी कौतुक केले आणि भविष्यात देखील सदरील विद्यार्थ्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी खऱ्या अर्थाने कृषी पदवीधर या नात्याने कृषी क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करून उल्लेखनीय यश मिळावावे असा प्रांजळ आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचा शेवट रासेयो स्वयंसेविका कु. अंबिका फताटे हिच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. साक्षी काळे हिने केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रथम, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

























