‘पुष्पा’ सिनेमाची श्रीवल्लीच्या करिअरची गाडी एकदम सुस्साट आहे! अभिनेत्री रश्मिका मंदानाची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, मात्र अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून ती संपूर्ण भारतात लोकप्रिय ठरली. यानंतर ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीच्या भूमिकेने तिचे फॅन फॉलोइंग आणखीनच वाढले. यानंतर रश्मिका आता थेट सुपरस्टार सलमान खानसोबत काम करणार आहे. रश्मिका दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची नायिका असेल.
ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे समीकरण अनेकदा हिट ठरलं आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर त्याचा कोणताही सिनेमा आला नव्हता, मात्र यंदा ५८ वर्षीय सलमानने त्याचा आगामी सिनेमा ‘सिकंदर’ची घोषणा केली. पुढील वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यांनी आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘गजनी’ दिग्दर्शित केला होता, ते दिग्दर्शक एआर मुरुगदास या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून साजिद नाडियादवालाची निर्मिती आहे. आता या चित्रपटाच्या नायिकेबाबत एक मोठे अपडेट समोर आले.
रश्मिकाने इस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिच्या ‘सिकंदर’ चित्रपटातील एन्ट्रीबद्दल प्रतिक्रिया दिली, अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सिकंदर चित्रपटाचा मी एक भाग असल्याने मी खूप आभारी आहे.’ त्यामुळे पुढील वर्षी ईदला सलमान खान आणि रश्मिका मंदान अशी जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे.
२८ वर्षीय रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये कन्नड, तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत अनेक हिट चित्रपट केले आहेत. सलमानसोबत तिचा हा पहिलाच चित्रपट असेल. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियादवाला नव्या जोडीच्या शोधात होता कारण पटकथेत अशी मागणी होती. त्याने रश्मिकाला स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यानंतर ती खूपच उत्साहित दिसली.
साजिद आणि रश्मिकाही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मात्र सलमानसोबत साजिदने याआधी विविध हिट सिनेमे केलेत. ‘किक’, ‘जुडवा’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमासाठी सलमान-साजिदने एकत्र काम केले आहे. तर दिग्दर्शक एआर मुरुगदास यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी ‘गजनी’, ‘हॉलिडे: ए सोल्जर नेव्हर ऑफ ड्युटी’ यांसारखे चित्रपट बॉलिवूडला दिले आहे.