सोलापूर : जागतिक जल, वन व हवामान दिनाच्या निमित्ताने ड्रीम फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय जलसाक्षरता दिंडीचा शुभारंभ आज सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरातून उत्साहात करण्यात आला. मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता बसलिंगप्पा हिपरगी, शोभाश्री मल्टिस्टेटचे व्यवस्थापक किरण पुजारी, शाहीर रमेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दिंडी व्यवस्थापक गुरुशांत भतगुणकी, गजराबाई गुरुशांत भतगुणकी, कस्तुरी पाटील, संगीता काशीनाथ भतगुणकी, शुभम पाटील, महानंदा केंगनाळकर, राणी पाटील, महादेव ठोंबरे, भारती बिराजदार, बसम्मा पाटील, अजय नरवडे यांच्यासह ड्रीम फाउंडेशन परिवारातील युवक, श्री बसवेश्वर तरुण मंडळ (पाटील वस्ती, गौडगाव बुद्रुक), बसव संगम शेतकरी गट (संगम वस्ती) येथील शेतकरी आणि जलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जलसाक्षरता दिंडीच्या रथाचे पूजन करण्यात आले. “पाणी सांभाळा – जीवन सांभाळा”, “पाणी हेच जीवन”, “जल है तो कल है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी केले. यावेळी शाहीर रमेश खाडे यांनी जलसंवर्धनाविषयी प्रेरणादायी गीते सादर करून उपस्थितांमध्ये जलजागृती निर्माण केली. उद्घाटक धर्मराज काडादी यांनी १२व्या शतकात श्री सिद्धेश्वर महाराजांनी केलेल्या जलव्यवस्थापन आणि तलाव निर्मितीच्या परंपरेची माहिती देत जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ड्रीम फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी या उपक्रमाला शासनाचे मार्गदर्शन व सहकार्य राहील, असे सांगून दिंडीस शुभेच्छा दिल्या.
सकाळी १० वाजता जलसाक्षरता दिंडी अक्कलकोट मार्गे श्रीशैलकडे प्रस्थान केली. मार्गातील गावांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार असून श्रीशैल येथे राष्ट्रीय जल कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
























