सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नौशाद काझी हे आर्थिक दुर्बल घटक (इ डब्ल्यू एस) प्रवर्गातून राज्यात नववी रँक मिळवत यशस्वी झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नौशाद शहाजहान काझी यांनी आर्थिक दुर्बल घटक (ई डब्ल्यू एस) प्रवर्गातून राज्यात ९ वी रँक मिळवली आहे.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण जाहीर केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती नंतर रात्री अंतिम निकाल जाहीर झाला आहे. एमपीएससी परीक्षेत आर्थिक दुर्बल घटक (इ डब्ल्यू एस) प्रवर्गातून नववी रँक मिळविणारे नौशाद काझी हे सध्या मुंबई मंत्रालय येथे पाणीपुरवठा विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


















