सोलापूर – स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूर शहराची आणि शहरातील रस्त्यांची अवस्था गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनलेली ठरत आहे. शनिवारी या खड्ड्यांमुळे बाजार समिती समोर पवनचक्की घेऊन जाणारा भला मोठा ट्रक आडवा झाला. यामुळे दिवसभर वाहतूक खोळंबली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेतून प्रशासन बोध घेणार का? असा सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जडवाहतुक होत असलेल्या अक्कलकोट रोड पाणी टाकी, शांती चौक, बोरामणी नाका, बाजार समिती समोरील चौक, येथे वारंवार अपघाताचे चक्र कायम असते. जड वाहनांमुळे येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दुयनीय बनली आहे.” रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता” नेमके वाहनधारकांना हे कळेनासे झाले आहे. रात्रीच्या काळोखात रस्त्यावरील भले मोठे खड्डे वाहनधारकांना नजरेस पडत नाहीत. तेव्हा मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याचा धोका संभवत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ते खचून खड्डे पडत आहेत.
अक्कलकोट रोड शांती चौक येथे प्रशासनाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थेच होणार असल्याने पुन्हा एकदा खड्ड्यांच्या सिलसिला कायम राहणार आहे. बोरामणी नाक्यापर्यंत जाणाऱ्या रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून अपघाताचा मोठा धोका संभवत आहे. मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे. खड्ड्यांची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीस्वारांना आपली दुचाकी तारेवरची कसरत करत चालवावी लागत आहे. “नजर घटी दुर्घटना घटी” या युक्तीप्रमाणे वाहनधारकांना डोळ्यात तेल घालून वाहने चालवावी लागत आहेत. मात्र याचे प्रशासनाला काही देणे घेणे नाही, एखाद्या निष्पाप जिवाचा बळी गेल्यानंतर जागे होणार का? असा सूर आता स्थानिक नागरिक तसेच वागधारकांमधून उमटत आहे.
जडवाहतुकीसाठी पर्यायी मार्ग द्यावा.
अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःहून ही जड वाहतूक बंद करण्यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. परंतु पर्यायी मार्ग नसल्याने ती पुन्हा एकदा शहरातून सुरू झाली. प्रशासनाने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
– योगेश कुंदुर, सामाजिक कार्यकर्ता
खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.
जडवाहतूक असणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तुळजापूर नाक्यापर्यंत रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या खड्ड्यांमुळे अपघात तसेच मणक्याचे आणि पाठीचे आजार होत आहेत. याशिवाय धूळ वाढत आहे. त्यामुळे शासनाचे देखील आजार होत आहेत.
– अजय कोंडुर, वाहनधारक
सोलापूर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना खड्डे चुकवत तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत असताना टिपलेले हे छायाचित्र




















