वसमत / हिंगोली : नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ऐतिहासिक यश मिळवत नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. एकूण ४४,३३२ मते पडली असून या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता मनमोहन बाहेती यांनी ३४५१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
मतवाटपानुसार,सुनीता मनमोहन बाहेती (राष्ट्रवादी काँग्रेस) – २०,१६५ मते
सीमा अब्दुल हफिस (काँग्रेस) – १६,७१४ मते
सुषमा बुड्डेवार (भाजप) ५,४०३ मते
या निकालामुळे वसमतच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून मतदारांनी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे.
या विजयामागे आमदार राजू भैया नवघरे यांची अथक मेहनत, प्रभावी रणनीती आणि तळागाळातील संपर्क निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रचाराच्या संपूर्ण काळात त्यांनी प्रत्येक प्रभागात लक्ष घालत कार्यकर्त्यांना ताकद दिली, तसेच विकासाचे ठोस मुद्दे जनतेसमोर मांडले.
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
शहरातील विविध भागांत जल्लोष,फटाके आणि विजयाच्या घोषणा ऐकू येत होत्या.
विजयानंतर सुनीता बाहेती यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. वसमत शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक काम केले जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
वसमत नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकताच नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


























