शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार रोहित पवार आज,बुधवारी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झालेत. बारामती ऍग्रो घोटाळा प्रकणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. यावेळी रोहित यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत त्यांच्या सोबत आल्या होत्या.
बारामती ऍग्रो घोटाळा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी व कार्यालयात ईडीची छापेमारी सुरू होती. परंतु, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. ईडीने 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना समन्स पाठवून 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, आज बुधवारी रोहित पवार चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले आहेत. चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्वात आधी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबईतील पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आल्या होत्या. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू असल्याने रोहित यांच्या ईडी चौकशीमुळे शरद पवार गट कमालीचा चिंतीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, ईडी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितलेय.