मोहोळ : राज्यात गाजत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गटा )च्या उमेदवार उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे तो अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला असल्याचे अनगर चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले . त्यामुळे अनगर नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची लढत तिरंगी नाही तर दुरंगी होणार आहे.उद्या बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्षपद बिनविरोध होणार की दुरंगी सामना होणार हे स्पष्ट होणार आहे.
उज्ज्वला थिटे यांनी काल कमांडो आणि पोलीस संरक्षणात आपला उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केला होता.आज अनगर नगर पंचापतीसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी छाननी केली असता उज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद करण्यात आला आहे.त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचा सामना दुरंगी होणार की उद्या अर्ज मागे घेतला जाणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष . पदासाठी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील व सरस्वती शिंदे यांचे अर्ज वैध ठरले आहेत .
अनगर नगरपंचायतीच्या निवडणूकीबाबत १७ प्रभागासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.प्रभाग ५ मध्ये सागर नरहरी गुंड यांनी भाजपा पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला ,तर याच प्रभागा मधून जयराम बोडके यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.उर्वरीत १६ प्रभागा मधून १६ च उमेदवारी अर्ज आल्याने व त्यांची आज छाननी झाल्यानंतर १६ नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. मात्र प्रभाग ५ मधील दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध झाले आहेत.उद्या पासून अर्ज माघारी घेण्याससुरुवात होत असून प्रभाग ५ बिनविरोध होणार की निवडणूक लागणार हे मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
















