पंढरपूर – येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील अनेक पुरातन घाटांची सध्या दूरवस्था झालेली आहे. चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर विकसीत करण्यासाठी शासनाकडून नमामी चंद्रभागा योजना आखली गेली. या योजने अंतर्गत भीमा नदीच्या उगमा पासून ती भीमा नदीच्या राज्यातील शेवट पर्यंतच्या नदीच्या प्रवाहाचा विकास करण्यात येणार होता. मात्र ही योजना केवळ कागदावरच दिसुन गेली. त्यामुळे उगमापासून ते शेवट पर्यंत जावूद्यात निदान शासनाने येथील वाळवंटात असलेल्या प्राचिन घाटांचा तसेच पुरातन मंदिराचे तरी संवर्धन करावे अशी मागणी वारकरी सांप्रदायातून केली जात आहे.
येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात जुन्या दगडी पुलापासून ते विष्णूपदा पर्यंत एकुण दहा ते बारा घाट तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना शहरातून नदीपात्रात जाण्यासाठी पूर्वी हे घाट तयार करण्यात आलेले होते. या मध्ये सर्वात प्रथम १७७५ मध्ये कुंभार घाटाचे बांधकाम करण्यात आले होते. या घाटाची आजमितीला कमालीची दूरवस्था झाली आहे. या घाटावर पालिकेकडून सुलभ शौचालय, ड्रेनेजचे पाणी साठविण्यासाठी सिमेंटच्या चेंबरचे बांधकाम करण्यात आले आहे. भिकाऱ्यांनी देखील या घाटावर कमालीचे अतिक्रमण केलेले आहे.
या बरोबरच नदी पात्रात असणारा विप्रदत्त घाट जो १८२० ते २२ मध्ये तयार करण्यात आला आहे. या घाटांची देखील बऱ्याच वर्षापासून दूरवस्था झाली आहे. या घाटाच्या खालच्या बाजूस म्हणजेच वाळवंटा लगत असणाऱ्या पायऱ्याच घाटापासून वेगळ्या झाल्याच्या दिसत आहे. त्यामुळे या घाटावरुन येजा करताना विशेषत: वृध्द माणसे, महिला तसेच लहान मुलांचे कमालीचे हाल होत आहेत.
या प्रमाणेच नगरपालिकेच्या जुन्या इमारती जवळ असणाऱ्या खिस्ते घाटाची देखील काहीशी पडझड झालेली आहे. त्यामुळे शासनाकडून किंवा प्रशासनाकडून चंद्रभागा वाळवंटाच्या सौंदर्यात भर टाकताना वाळवंटातील प्राचिन मंदिरांचे तसेच घाटांचे ही संवर्धन होण्याची गरज आहे.
—————————
वाळवंटातील घाटांचा प्राचिन इतिहास
पंढरपूरात सध्या अस्तित्वात असलेले प्राचिन घाट व त्या घाटांची निर्मिती करणाऱ्यांची नावे कंसात दिलेली आहेत. कुंभारघाट (१७७५ मध्ये सरदार लिमये ), महाव्दार घाट (चिंतु नागेश बडवे ) दत्तघाट ( जनाई आप्पा हरिसाद), कासारघाट ( जांभेकर नाईक ), चंद्रभागा घाट (१८१८ गोविंद महाराज चोपडकर),विप्रदत्त घाट ( चिंतामणराव पटवर्धन ), खिस्ते घाट (खिस्तेबुवा महाराज) अशा प्रकारे प्राचिन असे अकरा ते बारा घाट सध्या चंद्रभागा नदीच्या तिरावर अस्तित्वात आहेत अशी माहिती येथील प्राचिन गोष्टींचे अभ्यासक आणि अधिवक्ता असलेले धनंजय रानडे यांनी दिली.
————————–
चंद्रभागा नदीचे तसेच वाळवंटाचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. नमामी योजना कागदावरच आहे. शासनाने वाळवंटातील प्राचिन घाट, पुरातन मंदिरांकडे देखील लक्ष दिले पाहिजे.
रामकृष्ण महाराज वीर ( राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी सांप्रदाय पाईक संघ )
————————–
फोटोओळी – पंढरपूर – येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात असणाऱ्या विविध पुरातन घाटां बरोबरच चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या पुरातन मंदिरे , साधुसंतांच्या समाध्या तसेच चौफाळ्याच्या दगडी कट्यांची देखील मोठी दूरवस्था झालेली दिसत आहे.


















