तभा फ्लॅश न्यूज/गजानन मोरे : जवळा या गावामध्ये पिण्याचे पाणी, वीज नाही यासह अनेक समस्या निर्माण झाल्या असून शालेय विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना नागरी सुविधांअभावी अनेक संकटांना सामोरे लागत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.
जवळा या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये शेतातील पाणी येत असून या शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाने अवघड झाले आहे. स्वातंत्र्य दिनी शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थी, शिक्षक, गावकरी यांनी शाळा परिसराला वेढा घालून ध्वजारोहण केला तरी सरपंच, ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. शाळेतील शौचालय दुरुस्तीच्या नावाखाली मागील चार महिन्यापासून तोडफोड करून ठेवले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची शौचालयाअभावी मोठी गैरसोय होत आहे.
दोन सरपंचाची जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ
जवळा ग्रामपंचायतीचा कारभार दोन सरपंचांनी वाटून घेतला असून सुरुवातीची अडीच वर्षे कमलबाई साहेब शिखरे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले आणि त्यानंतरचे उर्वरित अडीच वर्षे इंदूबाई माधव पावडे या कारभार बघत आहेत परंतु हे दोन्ही सरपंच गावाच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी स्वीकारताना दिसून येत नाहीत.
ग्रामसेवक तालुक्यावरून गावाचे प्रशासन चालवतात
जवळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून गजानन कोंडमंगले कार्यरत असून ते लोहा येथे वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतमध्ये एकही दिवस न येता काही काम असले तर लोह्यामध्ये या असे गावकऱ्यांना ते म्हणतात. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाला सुद्धा ते अनुपस्थित होते.