तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी अखेर नियुक्ती झाली असून, नीता अंधारे यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने १ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, अंधारे यांची बदली बीड येथून धाराशिव येथे करण्यात आली आहे. त्या सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
नीता अंधारे या यापूर्वी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. बीडमध्ये त्यांनी प्रशासनिक सुत्रे प्रभावीपणे हाताळल्याचा अनुभव असून, आता धाराशिवमध्येही त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत.
सध्या धाराशिव नगर परिषदेत घोटाळे, रिक्त पदे, वायफळ पायाभूत सुविधा, अस्वच्छता आदी समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असल्यामुळे प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र होते. अशा वेळी नव्या मुख्याधिकाऱ्यांवर कारभार सुरळीत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, आगामी महिन्यांत नगर परिषद निवडणुका होणार असल्यामुळे, अंधारे यांच्यावर जबाबदारी अधिक आहे. बीडमधील त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव धाराशिवच्या विकासात उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा शहरवाशियातून व्यक्त होत आहे.