जालना : मानवतेला हादरवणारी घटना बदनापूर परिसरात घडली आहे. जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ एका नवजात स्त्री जातीच्या जिवंत बालिकेला रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री एका सज्जन नागरिकांनी डायल ११२ वर फोन करून ही माहिती दिली. “रस्त्याच्या कडेला एका नवजात बाळाला (अंदाजे पाच दिवसांचे) कोणी टाकून दिले आहे” असे सांगण्यात आले.
माहिती मिळताच सफौ गोविंद डोभाल आणि पोना राजेंद्र वेलदोडे हे अधिकारी तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला एका चादरीत गुंडाळलेली नवजात बालिका जिवंत अवस्थेत आढळली. पोलिसांनी तातडीने तिला सरकारी दवाखाना, बदनापूर येथे दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अज्ञात पालकांनी अपत्य जन्माची लपवणूक करून नवजात बालिकेला रस्त्याच्या कडेला सोडून दिले, ज्यामुळे तिच्या जीवाला व आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय करेवाड मॅडम या मा. पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपनी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे (पो.स्टे. बदनापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
या कारवाईत सफौ गोविंद डोभाल, पोना राजेंद्र वेलदोडे व पोक आधार भिसे यांनी तत्परता दाखवत मानवतेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या तत्परतेमुळे एका निरागस जीवाचा जीव वाचला आहे.


















