सांगोला – धनबाद-कोल्हापूर रेल्वेची एक फेरी वाढवावी, निजामबाद-पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरज जंक्शन पर्यंत करण्यात यावा अशी मागणी सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दीक्षाभूमी एक्सप्रेस रेल्वे क्र.११०४५ व ११०४६ कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या रेल्वेस प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस धावत असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून तरी आठवड्यातून दुसरी फेरी मंगळवारी देखील सुरू करावी यामुळे प्रवाशांची नागपूर, जबलपूर, प्रयागराज, गया या ठिकाणी जाण्याकरिता सोय होईल.
तसेच ट्रेन क्र.११४१३ व ११४१४ निजामबाद-पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरज स्टेशन पर्यंत करावा त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला या भागातील प्रवाशांची नांदेड, पूर्णा,आदिलाबाद, किनवट, माहूरगड (शक्तीपीठ) या ठिकाणी जाण्याची दररोज सोय होईल. तरी या मागणीचा सकारात्मक विचार करून या सेवा मंजूर कराव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे. या निवेदनाच्या प्रति कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, सोलापूर येथील सर्व खासदार, जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई व सिकंदराबाद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, पुणे यांना देण्यात आल्या आहेत.
निजामबाद-पंढरपूर या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करावा, शक्य नसेल तर किमान तो सांगोल्यापर्यंत करावा म्हणजे मंगळवेढा, आटपाडी व सांगोला परिसरातील नागरिकांना या रेल्वेने प्रवास करून कुर्डूवाडी येथून वंदे भारत एक्सप्रेसने काही तासातच मुंबई गाठणे शक्य होणार आहे.
-निलकंठ शिंदे, अध्यक्ष अशोक कामटे संघटना, सांगोला.



























