लातूर – राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार सक्षमपणे काम करत असून विकसित महाराष्ट्रा सोबत राज्याचा संस्कृतीक, पौराणिक वारसा व मूल्यांचे जतन करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी
महाराष्ट्रातील पौराणिक मंदिराचे जतन, संवर्धन व जीर्णोध्दारासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली.
यावेळी आयोजित महाअर्थीस भाविक भक्तांसह मान्यवरांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी निलंगा येथे ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन कार्याचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक तेजस गर्गे, तेजस्विनी आफळे, शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, राहुल केंद्रे, अजित पाटील कव्हेकर दत्ता शाहीर, आदी उपस्थित होते. निळकंठेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याच्या शुभारंभ ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आले. त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठीच माझ्याकडे सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सोपवली आहे. निलंग्यातील निळकंठेश्वर मंदिर हे जगाला हेवा वाटेल व राज्यातील दुर्मिळ मंदिरापैकी एक आहे. या मंदिराची रचना अत्यंत सुरेख असून या ठिकाणी महादेव, विष्णू व पार्वती याचा एकत्रित ठेवा असून भोलेनाथाचे आम्ही भक्त आहोत तो कधीही भक्तावर अन्याय होऊ देत नाही.
जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र अन मि सांस्कृतिक मंत्री आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील मंदीराचे संवर्धन आणि जतन करणारच व त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
माझे व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे संबंध जुने असून युवा मोर्चाच्या काळापासून आम्ही मित्र म्हणून भाजपात कार्य करीत आहोत.
श्री निळकंठेश्वर मंदिर व परिसराला राज्य संरक्षित वास्तूचा दर्जा देण्याचे जाहीर करून श्री निळकंठेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की निळकंठेश्वर मंदिर हे आमचे
श्रद्धास्थान आहे. आम्ही या मंदिराचे सेवेकरी व भक्त आहोत. या मंदिराच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी आगामी काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषदेचे आखाडा जवळ येत आहे. या राजकीय आखाड्यात विरोधकांना चारी मुंड्या चित करून जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपरिषद यावर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.
मंदिराचे काम हे भावी पिढीसाठी आदर्श ठरणार असून सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिशादर्शक वास्तुची जपणूक केली जाणार आहे. मला व माझ्या पक्षाला निळकंठेश्वराचा आशीर्वाद असून हेलिकॉप्टरच्या जीवघेणी अपघातातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सुद्धा सुखरूप बचावले असा उल्लेखित यांनी यावेळी केला. नीलकंठेश्वराच्या आशीर्वादाने जनतेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करण्याचे वचन आमदार संभाजी पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व तरुण कार्यकर्ते भक्तगण उपस्थित होते.
निलंगा शहरातील भगव्या कमानी, भगव्या पताका, भगवे झेंडे, भगवे फेटे यामुळे संपूर्ण शहर भगवे झाले होते. निळकंठेश्वर मंदिराचे प्रतिमा देऊन भक्तांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महाआरतीला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती .कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी आफळे यांनी केले तर आभार माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.




















