नांदेड / मुदखेड: मुदखेड शहराचे राजकीय वातावरण सध्या एका नव्या आणि हास्यास्पद चर्चेने ढवळून निघाले आहे. अनेक ‘युवा नेते’ म्हणून मिरवणारे तरुण नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी, त्यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी साधा प्रभागच मिळत नाहीये. याच कारणामुळे हे युवा नेते थेट नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहत असल्याची चर्चा सध्या शहराच्या गल्लीबोळात होताना दिसत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, ज्या नेत्यांना नगरसेवक म्हणून ग्राउंड लेव्हलवर आपली ताकद सिद्ध करता येत नाही, ते थेट नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरून केवळ हवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची सध्याची जमिनीवरील (ग्राउंड लेव्हल) परिस्थिती शून्यात असतानाही, ‘आपल्याशिवाय दुसरे कोणीच नाही’ अशा थाटात ते गावभर ढिंगारा पेटवत आहेत.
माजी नगरसेवक ते ‘गुत्तेदार’ नेतृत्वाचा नवा चेहरा!या चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे. एकेकाळी ज्या नेत्यांनी माजी नगरसेवक तसेच इतर पाच-पाच पदे भोगली आणि प्रशासक काळात तीन वर्षे नगरपरिषद ही जणू आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरली, ठेकेदारांकडून ‘मलिदा’ खाल्ला, आज तोच ‘गुत्तेदार’ (ठेकेदार) आता ‘भावी नगराध्यक्ष’ म्हणून मिरवत आहे.
एकंदरीत, मुदखेडच्या राजकारणातील ही नवी खेळी शहरवासियांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभाग निवडणुकीत स्वतःची जागा पक्की नसताना थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणे, हा शुद्ध राजकीय गोंधळ असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
 
	    	 
                                




















 
                