बार्शी – सामाजिक बांधिलकी जपत बार्शी तालुक्यातील जामगांव (आवटे) येथील ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकारी श्रीमती रेश्मा राहुल मुकटे यांनी आपला मुलगा रणवीर मुकटे याचा वाढदिवस आज, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी उपळे (दुमाला) येथील सहारा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. हा अनोखा उपक्रम बार्शी तालुक्यात एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आला आहे.
जामगांव (आवटे) येथील रहिवासी रेश्मा मुकटे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त महागड्या पार्ट्यांचा आणि दिखाऊ खर्चाचा फाटा देत, सहारा वृद्धाश्रमातील निराधार वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा निर्णय घेतला.
सेवा आणि आनंदाचा अनोखा संगम:
मुकटे परिवाराने वृद्धाश्रमात उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी वृद्धांना भेटवस्तू प्रदान केल्या, तसेच त्यांच्यासाठी अन्नदान केले. यासोबतच वृद्धाश्रमाच्या परिसरात हिरवळ वाढवण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी झाडे देखील भेट देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी वृद्धाश्रमास एक प्रेरणादायी प्रतिमा भेट देऊन सामाजिक संदेश दिला.
सामाजिक जाणीव ठेवून साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसामुळे वृद्धांना एक वेगळाच आनंद मिळाला आणि हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
उपस्थितांची मांदियाळी:
यावेळी मुकटे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये राहुल मुकटे, विकास मुकटे, मंगल मुकटे, रेश्मा मुकटे, तेजस्वी मुकटे, वाढदिवस असलेल्या रणवीर मुकटे, ओवी मुकटे आणि आराध्या मुकटे यांचा सहभाग होता. तसेच सहारा वृद्धाश्रमातील सर्व सहकारी उपस्थित होते.
रेश्मा मुकटे यांनी सामाजिक बांधिलकीचे हे अनमोल कार्य करून बार्शी तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.तसेच यावेळी रेश्मा मुकटे ( एकता महिला मंच बार्शी तालुका कोषाअध्यक्षा)या बोलताना म्हणाल्या कि, ”हा वाढदिवस आम्ही आज अनाथ वृद्धांसोबत साजरा केला, हा आमच्यासाठी केवळ एक आगळावेगळा उपक्रम नव्हता, तर एक भावनिक अनुभव होता. या निरागस आणि प्रेमळ वृद्धांसोबत आनंद वाटून घेताना माझ्या मुलाच्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तो कोणत्याही भौतिक सुखाहून खूप मोठा आहे.”
”या उपक्रमाने आम्हाला खूप वेगळा आणि अवर्णनीय आनंद तर दिलाच, पण त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी करण्याची एक नवीन आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यातील खास क्षण अशा गरजूंसोबत साजरे करावेत, हीच माझी इच्छा आहे.”


















