तभा फ्लॅश न्यूज/महेश भंडारकवठेकर : कॉरिडॉर बाधितांना ठराविक दिलेल्या वेळेला चर्चेसाठी नेमणूक केलेले संबंधित आधिकारीच उपस्थित नसल्यामुळे कॉरिडॉर बाधित नागरिकांतून प्रशासनातील आधिकाऱ्यांच्या वागण्या बद्दल रोष व्यक्त केला जातो आहे. आधिकाऱ्यांच्या अशा वागण्या बद्दल प्रशासनाचा धिक्कार करीत अनेक बाधित नागरिकांनी नियोजित बैठकीत सहभागी न होताच परत घरी जाणे पसंत केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीमप्रोजक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाची गेल्या दोन,तीन वर्षापासून नुसतीच चर्चा होत असल्याची टिका होत होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वोच्च मोबदला देवून तसेच सर्वांचे समाधान करुन लवकरच हा प्रकल्प सुरु होईल असे आश्वासन देवून जिल्हा प्रशासनाला तयारीला लागण्याच्या सुचना केलेल्या होत्या. त्या प्रमाणे जिल्हा प्रशासनाने मागील काही दिवसापूर्वी नुकतीच मुख्यमंत्र्यांशी मुंबई येथील त्यांच्या वर्षा या निवासस्थानी या प्रकल्पा विषयी चर्चा केली. या प्रकल्पाचा तयार करण्यात आलेला अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांना दाखवून तो लवकरच कार्यान्वीत करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या.
त्या नंतर जिल्हाधिकारी कुमार आर्शीर्वाद यांनी या आराखड्या विषयी संभाव्य बाधितांशी चर्चा करण्यासाठी खास तीन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या आधिकाऱ्यांची येथे खास नेमणूक करुन २५ जुलै पासून ते ५ आँगस्ट २०२५ या कालावधीत २५ च्या एका गटा प्रमाणे सर्व साडेसहाशे ते सातशे संभाव्य सवsबाधित नागरिकांशी चर्चा करुन त्यांच्या बद्दलची सर्व माहिती, बाधितांच्या अपेक्षा, त्यांच्या शंका या बद्दलची माहिती संकलीत केली जाईल. त्या प्रमाणे वरिष्ठ पातळीवर या माहितीचे सादरीकरण करुन सर्वोच्च मोबदला कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आलेले होते. त्या प्रमाणे २५ जुलै पासून संभाव्य बाधित नागरिकांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले होते.
दरम्यान सोमवारी येथील भक्तीमार्गावरील योगधाम मध्ये दुपारी दीडच्या सुमारास संभाव्य बाधित २५ ते ३० नागरिकांच्या गटाला नोटीसा देवून बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. त्या नोटीसां प्रमाणे नागरिक योगधाम येथे बैठकीसाठी नियोजित वेळे पेक्षा अगोदर काही वेळ जमा झाले. त्यावेळी पंढरपूरात पालकमंत्र्यांचा दौरा होता. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे मिटींगसाठी जात असल्याचे सांगत आधिकारी या मंडळींशी चर्चा न करताच योगधाम येथून बाहेर पडले.
दरम्यान चर्चेसाठी आलेले संभाव्य बाधित नागरिकांचा गट आत्ता आधिकारी येतील, थोड्या वेळाने येतील असे म्हणत त्यांची वाट पहात सुमारे अर्धा ते एक तास ताटकळत त्या ठिकाणीच त्यांची वाट पहात बसुन राहिले. अखेर आधिकाऱ्यांची वाट पहात असताना त्यातील काही नागरिकांचा पारा चढला. त्यामुळे प्रशासनातील आधिकाऱ्यांनी आजच आमची ही अवस्था केलेली आहे. त्यामुळे उद्या आमची घरे,दारे गेल्यावर ही आधिकारी मंडळी आम्हाला कशी वागणूक देतील असे म्हणत उपस्थित नसलेल्या आधिकाऱ्यांवर चांगलेच वैतागले.
लगेचच या मधील काहीं नागरिकांनी आधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. वेळ न पाळणाऱ्या आधिकाऱ्यांचा धिक्कार असो, एकच जिद्द कॉरिडॉर रद्द अशा घोषणा देत बैठकीला न थांबताच आधिकाऱ्यांची वाट पाहून कंटाळलेले नागरिकांनी अखेर आपल्या घराचा रस्ता धरणे पसंद केले.
नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी सोमवारी दुपारी बैठक बोलाविण्यात आलेली होती. आम्ही बरोबर दीडच्या दरम्यान येथे बैठकीसाठी आलेलो होतो. पहिली मिटींग संपल्यानंतर आधिकारी थांबले पण आम्हाला दुसरे काम आहे आम्ही अर्ध्या तासात येतो असे सांगून आधिकारी निघून गेले.त्यामुळे तीन वाजून गेले आहेत तरी कोणताही आधिकारी येथे आलेले नाही. आम्ही काही भिकारी नाही आहोत की आम्हाला खायला मिळत नाही म्हणून आम्ही त्यांची वाट बघायची.त्यामुळे आम्ही मंडळी त्यांचा निषेध करुन निघुन जात आहोत.
कॉरिडॉर कुणावरही लादला जाणार नाही : पालकमंत्री
दरम्यान सोमवारी पालकमंत्री पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले होते. नियोजित कार्यक्रमा नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. कॉरिडॉर विषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले, प्रकल्प उभा रहात असताना त्या प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या तेथील लोकांचा सुरुवातीला त्याला विरोध हा असतोच.
समृध्दी महामार्ग जेव्हा उभा राहिला तेव्हा अनेक लोकांनी त्याला विरोध केलेला होता. तिच लोकं पुन्हा समृध्दी महामार्ग तयार झाल्यावर त्या मध्ये सहभागी झाले आणि सर्वोत्तम मार्ग झाल्याचे आज सांगत आहेत. अनेक विमानतळाला विरोध झालेला आहे. मात्र जेव्हा त्या ठिकाणी विमानतळ झाले तेव्हा हे विरोध करणारे लोकच हे खूप चांगले झाले असते सांगतात. अनेक ठिकाणी एमआयडीसी उभा रहात असताना विरोध झाल्याचे आपण पाहिलेले आहे. मात्र एमआयडीसी झाल्यावर झालेली प्रगती तेच लोक भरभरुन सांगतात. त्यामुळे कोणत्याही व्यवस्था उभ्या करीत असताना काही लोकांना वाटते की माझी स्वत:ची हक्काची जागा जाते आहे की काय, माझ्या व्यवसायाचे काय होईल ?
मात्र त्यांच्या अशा भावना या बिलकुल चुकीच्या नाहीत. त्यामुळे या सगळ्यांचा विचार हा सरकार करेल आणि सगळ्यांना समाधानी करुनच विठुरायाच्या नगरीचा विकास होईल, कॉरिडॉर होईल यात आपणाला शंका नाही. त्याबाबत सर्वजण निश्चिंत रहावा. कुठल्याही परिस्थिती मध्ये हा कॉरिडॉर कुणावरही लादला जाणार नाही असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
Post Views: 4