सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘भूमी’ या घटकात राज्यस्तरावर ३ लाख ते १० लाख लोकसंख्या गटामध्ये एकमेव शहर म्हणून मानाचा दोन कोटी रुपयांचा विशेष पुरस्कार पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे पुणे विभागात सोलापूर महानगरपालिका प्रथम क्रमांकावर ठरली आहे.
मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल , उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, महेश देवकर, मनोज देवकर, उद्यान अधिकारी स्वप्नील सोलंकर, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार उपस्थित होते.
‘भूमी’ या घटकांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध व्यापक उपक्रम राबविले होते. वन विभाग, पर्यावरणप्रेमी संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच महाविद्यालयांच्या सहकार्याने शहरात मोठ्या प्रमाणावर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मागील काही वर्षांत लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करून त्यांची वाढ व जतन सुनिश्चित करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांत रोपवाटिका उभारून हरित पट्टे विकसित करण्यात आले असून शहर हरित व सुंदर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच घरोघरी कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करत वीज निर्मिती व सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असून दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोलापूर शहराने ‘ओडीएफ प्लस प्लस’ दर्जा कायम राखला आहे. स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे सोलापूर शहराने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कामगिरी संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब : महापौर कोंड्याल
या सर्वसमावेशक पर्यावरणीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेऊन सोलापूर महानगरपालिकेला हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ही कामगिरी संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी या यशाचे श्रेय महानगरपालिकेचे आयुक्त, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच सोलापूरकर नागरिकांना दिले असून भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अधिक जोमाने कार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
हरित सोलापूर वाढीसाठी प्रयत्न करणार : उपमहापौर देवकर
हरित सोलापूर करण्याच्या दृष्टीने हा एक प्रेरणादायी सन्मान पुरस्कार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पूर्ण टीम व सोलापुरातील पर्यावरण संस्था मिळुन वृक्ष लागवड व संवर्धन मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचाच सन्मान झाला व नक्कीच पुढील काळात हरित सोलापूर वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची भावना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केली.

























