सोलापूर – तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी सातव्या श्री मश्रृम गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीपरंपरा जपण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
या अंतर्गत शनिवार दि. १७ ते सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत ‘श्री गजानन विजय ग्रंथ पारायण’ होणार आहे. पारायणासाठी आवश्यक ग्रंथ देवस्थानतर्फे उपलब्ध करून दिला जाणार असून, भाविकांनी स्वतःचे आसन व पूजेसाठी लागणारे साहित्य सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या तीन दिवसांत दररोज दुपारी २ ते ६ या वेळेत महिला भजनी मंडळांचे भजन, तर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हरिपाठ आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत १०८ श्री सत्यविनायक महापूजा होणार आहे. या पूजेसाठी १०८ भाविक जोडप्यांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. पूजेसाठी बसणाऱ्या भाविकांनी तांब्याचा तांब्या, तांब्याचे ताट, पळी, फुलपात्र, साधे ताट तसेच नैवेद्यासाठी २१ कणकीचे मोदक सोबत आणावेत. पूजेची वर्गणी ७५१ रुपये इतकी असून, पूजेत वापरण्यात येणारी चांदीची मूर्ती व ‘श्री’ यांचा फोटो देवस्थानतर्फे ओटीमध्ये देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
त्याच दिवशी सायंकाळी ९ ते ११ या वेळेत ‘ सुंदरकांड ‘ भजन-गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम श्री गोपाळ खंडेलवाल व सहकारी, राजस्थानी ब्राह्मण परिवार व सत्संग मंडळ, सोलापूर यांच्या सादरीकरणाने होणार आहे.
गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी गणेश जयंतीच्या मुख्य दिवशी पहाटे महाअभिषेक, सुवर्ण अलंकार पूजा, महाआरती, गणेश जन्मोत्सव, गुलालोत्सव, पाळणा, विशेष पूजा, महाप्रसाद तसेच भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, महाआरतीने या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री मश्रृम गणपती देवस्थान, तळे हिप्परगा, सोलापूर–तुळजापूर रोड, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पुजारी यांच्याशी मोबाईल क्रमांक ८३२९३४२६७६ वर संपर्क साधावा.
















