टेंभुर्णी – रोहित धोत्रे यूथ फाउंडेशन टेंभुर्णी व आर.डी. ग्रुप टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त टेंभुर्णी ग्रामीण पत्रकार संघ व टेंभुर्णी प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. सहा जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांना मिठाई, पुष्पहार, पेन व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन करताना अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा उल्लेख केला.
ते म्हणाले, “आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सत्य, निर्भीडता आणि समाजप्रबोधन हे पत्रकारितेचे मूलतत्त्व असल्याचे अधोरेखित केले. आजच्या काळातही पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य प्रामाणिकपणे करावे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
टेंभुर्णी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष सतिश चांदगुडे तसेच टेंभुर्णी ग्रामीण पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष धनंजय भोसले यांनी सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करत आर.डी. ग्रुप व रोहित धोत्रे यूथ फाउंडेशनचे आभार मानले.
या कार्यक्रमास टेंभुर्णीतील पत्रकार संतोष वाघमारे, प्रेस क्लबचे ज्येष्ठ सदस्य सोपान ढगे, सुहास साळुंखे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल जगताप, पत्रकार संघाचे सचिव गणेश पोळ, माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गाडेकर, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गणेश चौगुले, सुरज देशमुख, धनंजय मोरे, महावीर वजाळे आदी उपस्थित होते.
सदर पत्रकारांचा सत्कार रोहित धोत्रे यूथ फाउंडेशन व आर.डी. ग्रुपचे अध्यक्ष सूरज भैया धोत्रे, उपाध्यक्ष राहुल धोत्रे, तसेच योगेश वाघमारे, पृथ्वीराज जगताप, ओम आरडे, शुभम पवार, सचिन आखाडे, रोहन जगताप, ओंकार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
























