सोलापूर – “देवाधिदेव महादेव… ॐ नमः शिवाय… हर हर महादेव!” या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते महाशिवरात्रीचे. सोलापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच आबालवृद्ध भाविकांची दर्शनासाठी एकच मांदियाळी उसळली होती. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने संपूर्ण मंदिर परिसरात अनामिक चैतन्य निर्माण झाले.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पहाटे साडेपाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. काकड आरतीने दिवसाची मंगल सुरुवात होताच रुद्राभिषेक आणि १०८ वेळा ‘ॐ नमः शिवाय’ जपाचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाआरतीने वातावरण अधिक भक्तिमय झाले. सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत पुन्हा एकदा सामूहिक ‘ॐ नमः शिवाय’ जप व बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. मंदिरातील प्रत्येक कोपऱ्यातून मंत्रोच्चारांचा निनाद ऐकू येत होता.
महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्यासाठी आणि बिल्वपत्र अर्पण करण्यासाठी सुहासिनी महिला, तरुणी आणि युवकांनी मोठ्या श्रद्धेने रांगा लावल्या होत्या. अनेक महिलांनी तुपाचे दिवे लावून शिवयोग समाधीपाशी प्रार्थना केली. ६८ लिंगांपैकी अमृतलिंगासह विविध शिवलिंगांवर दुग्धाभिषेक करण्यात आला. फुले, बिल्वपत्र आणि अक्षतांनी सजलेल्या मंदिरात भक्तीभावाची प्रचिती प्रत्येक क्षणी येत होती.
सायंकाळी आणि रात्रीही धार्मिक कार्यक्रमांची मालिका सुरूच होती. शिवयोग समाधीसमोर १०८ नामावली पठण, रुद्राभिषेक आणि महाआरती संपन्न झाली. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. महाराजांच्या गादीस विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत ‘ॐ नमः शिवाय’ या जपाचा अखंड जागर सुरू होता.
दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा ठेवण्यात आल्या होत्या, जेणेकरून सर्वांना सुरळीत दर्शन घेता येईल. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली होती. मंदिराचे पुजारी गुरुराज हब्बू यांनी सांगितले की, यंदा प्रतिवर्षीपेक्षा अधिक भाविकांनी उपस्थिती लावली असून सोलापूर शहर जिल्ह्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा येथील शिवभक्तांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. त्यामुळे महाशिवरात्रीचा उत्साह अधिक वाढलेला दिसून येत आहे.
विशेष म्हणजे सोलापूर शहराबरोबरच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतूनही अनेक भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी मंदिर परिसर गजबजून टाकला होता. भक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेमुळे मंदिर परिसरात दिवसभर आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती. महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात साजरा झालेला ‘ॐ नमः शिवाय’ जपाचा अखंड जागर हा भक्ती, परंपरा आणि सामूहिक श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा ठरला.



























