सोलापूर – महाराष्ट्र शासनाने ०२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करण्याचे आयोजन केले असून, त्यानिमित्त ०२ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत पोलीस आयुक्तालयामार्फत विविध जनजागृतीपर व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहात नागरिकांना सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
या अनुषंगाने दि. ०८ जानेवारी रोजी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीतील सात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी व इतर चोरीच्या एकूण ४६ गुन्ह्यांमधील तब्बल ७४ लाख ६६ हजार ७९९ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत देण्यासाठी मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा क्रमांक ३४/२०१५ (भादंवि कलम ३८०) तब्बल दहा वर्षांनंतर उघडकीस आणण्यात पोलीस दलास यश आले असून, या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. तसेच विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला मंदिर चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणून, चोरीस गेलेल्या विविध देवतांच्या मूर्ती फिर्यादीस परत करण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे उपस्थित फिर्यादींमध्ये समाधान व्यक्त होत असून, सर्व फिर्यादींनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल सहर्ष आभार मानले.
यावेळी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्यासह विविध विभागांचे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, अधिकारी, अंमलदार व संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















