सोलापूर : शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही महापालिका प्रशासन कार्यवाही करत नाही. यामुळे अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)सोलापूर शहराच्या वतीने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन “एक कॉल… खड्ड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व” या विशेष उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठे कसरत करावी लागत आहे. छोटे – मोठे अपघात होत आहेत. नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. महापालिका तत्काळ कार्यवाही करत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अखेर शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एमआयएम सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षातर्फे स्वखर्चातून डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी रोड रोलर, ट्रॅक्टर, जेसीबी अशी यंत्रणा वापरण्यात आली.
मौलाली चौक येथे आज सकाळी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी उपक्रमाचे आयोजन केले असून या उपक्रमाद्वारे सोलापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. “आम्ही कित्येकदा तक्रारी दिल्या, पण प्रशासन हललं नाही.आता निदान कोणीतरी पुढाकार घेतोय. हेच मोठं समाधान आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सोलापूर शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. या संदर्भात महापालिकेचे मौन आहे. याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याबरोबरच ते खड्डे बुजवणे या उद्देशातून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना कुठेही खड्डा दिसला, तर फक्त एक कॉल करा आणि त्यावर लगेच काम सुरू होतंय… तेही पक्षाच्या स्वतःच्या खर्चातून केले जाईल. रस्त्यावरील खड्डे बुजवणे तशी महापालिकेची जबाबदारी मात्र महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने आता ही नागरिकांकडूनच ही जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याची टीका जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केली आहे.


















